बोधकथा - ३
राजा सूर्यसेनचे राज्य प्रतापगडापर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्ये त्याच्या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्नाच्या वयाची झाल्यावर राजाने तिच्यासाठी वर पाहणे सुरू केले. त्याची इच्छा अशी होती, की आपल्या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्हायला पाहिजे, जो आपल्यानंतर या राज्याचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकेल.
राजकुमारी आणि राज्यावर अनेक राजकुमारांची नजर होती; मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जो कोणी विवाहाचा प्रस्ताव ठेवत असे, त्याला राजा सर्वांत मौल्यवान वस्तू घेऊन ये असे सांगत असे. लोभी व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी त्याने पुढे अट ठेवली होती, की ती वस्तू मला आवडली नाही तर मी ती वस्तू आणणाऱ्याला कारागृहात टाकणार.
अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्तू घेऊन आले. परंतु राजाने त्या वस्तूंना असहमती दर्शवत त्यांना कारागृहात टाकले. राजाला विश्वास होता, की एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धिमान, वीर पुरुष आपल्या राजकन्येसाठी ही अट पूर्ण करील.
एके दिवशी त्याच्याच राज्यातील एका छोट्या खेड्यातील एका शेतकऱ्याचा तरुण मुलगा रघू तीन वस्तू घेऊन राजाकडे आला. रघू म्हणाला, 'मी जगातील तीन अनमोल वस्तू आणल्या. त्यांपैकी पहिली म्हणजे माती, जी आपल्याला अन्न देते. दुसरे म्हणजे पाणी, जे भेदाभेद न पाहता सर्वांची तृषा शांत करते, आयुष्य वाचवते. तिसरी वस्तू म्हणजे पुस्तक, जे सर्वांना समान न्यायाने ज्ञानदान करते, ज्ञानाचा आधार म्हणजे पुस्तक. ज्ञानाची गरज भागवण्याचे काम याच्याकडून केले जाते.'
राजा या तिन्ही वस्तू पाहून व त्या आणणाऱ्याचे विचार ऐकून भारावून गेला. त्याने त्याच्या मुलीचा विवाह रघूशी केला व राज्याचा उत्तराधिकारी म्हणून त्याला नियुक्त केले.
तात्पर्य : बुद्धिमान लोकांकडूनच जगातील कठिणातील कठीण प्रश्नांची उत्तरे प्राप्त केली जाऊ शकतात.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment