विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष शासनव्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम तहसील कार्यालय, वर्धा येथे आयोजित करण्यात आला.
‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’मधून विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख
वर्धा: विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष शासनव्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम तहसील कार्यालय, वर्धा येथे आयोजित करण्यात आला. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा येथील प्राचार्य डॉ. आशिष बी. ससाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरडे सर, चिकाटे सर आणि ७८ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन विविध शासकीय विभागांचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेतले.
यावेळी मा. तहसीलदार श्री. संदीप पुंडेकर आणि मा. नायब तहसीलदार श्री. संदीप डाबेराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तहसील प्रशासनाची भूमिका, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, जनगणना विभाग, सेतू विभाग तसेच आवक-जावक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. शासन कसे चालते, नागरिकांना सेवा कशा मिळतात आणि प्रशासनाची भूमिका काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला. अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले आणि आपल्या जिज्ञासांचे समाधान करून घेतले.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा जागरूक नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडवणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती मिळाल्यास त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्व, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते. याच उद्देशाने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, अनुभव आणि संवाद यांचा सेतू ठरत आहे.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अमृत, वर्धा चे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश पंडितराव खराटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शासकीय प्रशासन जवळून समजून घेण्याची ही संधी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment