महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचलित असलेल्या या प्रथेमागची परंपरा आणि कृतज्ञ भावना -
आता आषाढ महिना संपूनश्रावण महिना सुरू होत आहे. हा महिना म्हणजे दान - धर्म, व्रत वैकल्ये आणि सण उत्सवांचा महिना असतो. विविध भाग, त्यातील वेगवेगळ्या प्रथा असे असले तरी या सगळ्या मागची भावना एकच असते,ती म्हणजे कृतज्ञतेची! जे मला निसर्गाने भरभरून दिले आहे त्यातील काही भाग पुन्हा निर्सगाला परत करणे, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना देणे. यात कोठेही माझे जास्त आहे म्हणून दान आहे,असा भाव नाही तर मी सुद्धा या निसर्गचक्राचा एक भाग आहे. निसर्गाची ही कृपा सदैव राहावी,ही भावना त्यामागे आहे.
नदीची ओटी भरणे, खरंतर अनेक भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असते परंतु ओटीचे महत्त्व श्रावणातही तेवढेच असते.
आपली संस्कृती नदीकडे केवळ पाण्याचा प्रवाह म्हणून पाहत नाही; ती तिला एक सजीव स्त्री, एक शक्तिरूप मानते. म्हणूनच आपल्या नद्यांची नावे बहुतेक स्त्रीलिंगी आहेत, आणि तिच्याशी जोडलेले विधीही तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करणारे आहेत.
नदीला स्त्री मानले, की तिच्याशी निगडित अनेक गोष्टी नव्या अर्थाने उलगडतात. आपल्या परंपरेत अशी एक कल्पना आढळते की पावसाळ्यात पुराचे पाणी आणि त्याबरोबर वाहून येणारा गाळ नदीला ‘रजस्वला’ बनवतो. ही संकल्पना केवळ धार्मिक नाही; ती स्त्रीशरीर, निसर्गचक्र आणि भूमीची सुपीकता, म्हणजेच प्रजननशक्ती यांना जोडणारी समृद्ध दृष्टी आहे.पुराच्या काळात नदी रौद्र, स्पर्श न करण्याजोगी आणि धोकादायक असते; पण हाच पूर ओसरल्यानंतर नदीने आणलेला गाळ जमिनीला सुपीक करतो, तिला नवजीवन देतो.
अनेक ठिकाणी नदीचा सन्मान करण्यासाठी तिची ओटी भरली जाते. जशी विवाहित स्त्रीची ओटी भरून तिच्या सौभाग्याचा, समृद्धीचा आणि प्रजननक्षमतेचा सन्मान केला जातो, त्याच धर्तीवर नदीच्या शक्तीचा, तिच्या स्त्रीत्वाचा आणि जीवनदायिनी स्वरूपाचा गौरव केला जातो. हा विधी केवळ तिच्या प्रजननशक्तीचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नाही. पुराच्या वेळी नदी शांत व्हावी, तिचा कोप ओसरावा, तिने गावाला किंवा लोकांना इजा करू नये या प्रार्थनेसाठीही तो केला जातो. पूर्वी हा विधी अनेक ठिकाणी सर्रास केला जात असे. आज मात्र हा विधी हळूहळू लुप्त होत चाललेला दिसतो. या परंपरांकडे पाहिल्यावर आपल्या समाजाची विचारसंपन्नता आणि निसर्गाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी जाणवते. नदी ही फक्त उपजीविकेचे साधन नव्हे; ती एक जिवंत शक्ती आहे. नदीला मान देणे म्हणजे पाण्याचा, भूमीचा, फलनाचा आणि अखेर जीवनाचाच सन्मान करणे होय. तुम्ही कधी नदीची ओटी भरताना पाहिली आहे का? नक्की सांगा.
संकलित सौरभ मराठे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment