बोधकथा - ३९
परीस म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहेच. परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते. एका व्यक्तीने त्या परिसाचा ध्यास घेतला. काहीही झाले, तरी परीस शोध घ्यायचा असे त्याने ठरवले; पण परीस कसा शोधायचा हे मात्र त्याला माहीत नव्हते. मग त्याच्या लक्षात आले, की परीस शोधणे फारसे अवघड नाही. हातात एक लोखंडाची साखळी घ्यायची आणि प्रत्येक दगड त्या साखळीला लावून पाहायचा. जो दगड लावल्यावर ती साखळी सोन्याची होईल तो परीस.
त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच एका कामाला स्वतःला अक्षरशः जुंपले. दिसेल तो, वेगळा वाटेल तो दगड घेऊन तो हातातील साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. हाच त्याचा दिनक्रम झाला. यात अनेक दिवस गेले... आठवडे, महिने गेले आणि कित्येक वर्षे लोटली. परीस काही त्याला सापडला नाही. तो वृद्धत्वाकडे झुकला.
एके दिवशी असाच तो दगड हातात घेऊन साखळीला लावत असताना एका तरुणा त्या व्यक्तीला पाहिले. त्याने विचारले, 'काय आजोबा, काय करताय?'
तो उत्तरला, 'मी परिसाचा शोध घेतोय.'
तरुणाने त्याला विचारले, की 'परीस ओळखणार कसा?'
तो माणूस म्हणाला, 'ज्या दगडाचा स्पर्श झाल्यावर ही साखळी सोन्याची होईल, तो दगड म्हणजे परीस.'
त्यावर तो तरुण म्हणाला, 'पण आजोबा, तुमचे लक्ष कुठे आहे? तुमच्या हातातील साखळी तर सोन्याचीच आहे की!'
तेव्हा त्या माणसाचे लक्ष त्या साखळीकडे गेले आणि तो थक्कच झाला.
प्रत्येक दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात तो साखळीकडे पाहायचेच विसरला होता. त्यामुळे कुठल्या दगडामुळे साखळी सोन्याची झाली, हे त्याला समजलेच नाही आणि परिसाचा शोध लागूनही परीस त्याच्या हाती लागलाच नाही.
बोध : परीस प्रत्येकालाच जीवनात कधी तरी सापडत असतो; पण त्याची वेळीच ओळख करून घेणे महत्त्वाचे असते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment