बोधकथा - ३३
पूर्वीच्या काळी एक कष्टाळू व्यापारी होता. तो आपला गावोगावी चालत फिरून व्यापार करत असे. उन्हातान्हात, पावसात, कधी निर्मनुष्य जंगलातून, तर कधी गर्दीच्या बाजारातून तो व्यापार करत भटकत असे.
एकदा तो संध्याकाळच्या सुमारास एका गावातून दुसऱ्या गावाकडे निघाला. मध्ये दाट जंगल होते. सूर्य मावळतीला झुकला होता आणि वाट निर्मनुष्य झाली होती. अचानक चार चोरांनी झाडांडून बाहेर येऊन त्याचा रस्ता अडवला. त्यांच्या हातात शस्त्रे होती.
क्षणभर व्यापारी दचकला आणि थोडा घाबरलाही. त्याच्या हृदयाची धडधड वाढली; पण त्याने गोंधळून न जाता प्रसंगावधान राखले. शांतपणे तो म्हणाला, “मी एकटा नाहीये. माझे मित्र मागून येतच आहेत. मी हाका मारल्या, की ते लगेच ते येतील.'
चोर एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना शंका आली; पण त्यांनी त्याच्यावर झडप घातली. तेवढ्यात व्यापाऱ्याने आपल्या हातातील जड पिशवी जोरात फिरवली. त्या पिशवीत धातूची वजने होती. त्या पिशवीने केलेला प्रहार इतका जोराचा होता, की एका चोराच्या कपाळातून रक्त आले. तो वेदनेने ओरडला.
हे पाहून बाकीचे चोर थोडे मागे सरकले. त्याच वेळी व्यापाऱ्याने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला, 'सगळ्यांनी लवकर या! मला वाचवा!' त्याचा आवाज जंगलात घुमला. आता खरेच त्याचे मित्र येतील, या भीतीने चोरांची गडबड उडाली. जखमी साथीदाराला ओढून ते चारही जण जंगलात पसार झाले.
व्यापाऱ्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
बोध : कठीण प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे विचार करून योग्य वेळी योग्य कृती केली, तर मोठे संकटही टाळता येते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment