ज्या संकल्पनांमुळे जीवनात आनंद आणि उद्देश सापडतो, अशा जपानी संकल्पनांचे सार सांगणाऱ्या 'इकिगाई' या पुस्तकाचा परिचय...
इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून तयार झाला आहे. 'इकि' म्हणजे आयुष्य आणि 'गाई' म्हणजे मूल्य किंवा किंमत. त्यामुळे इकिगाई म्हणजे तुमचे जीवनमूल्य किंवा जीवनातील आनंद. सोप्या शब्दांत सांगायचे, तर तुम्हाला ज्या कारणामुळे सकाळी उठावेसे वाटते, ते कारण म्हणजे इकिगाई.
'इकिगाई' हे युकारी मित्सुहाशी यांचे पुस्तक जपानी संकल्पनांचे सार आहे, ज्या संकल्पनांमुळे जीवनात आनंद आणि उद्देश सापडतो. जपानमध्ये वाढलेल्या मित्सुहाशी यांनी टोकियोतील बालपणाच्या अनुभवांवरून 'इकिगाई'चे मर्म समजावले आहे. 'इकिगाई' म्हणजे सकाळी उत्साहाने उठण्याचे ध्येय. ते भव्य असेलच असे नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधणारे असेल. उदा. बागकाम किंवा कुत्र्याला फिरवणे. पुस्तकात विविध व्यक्तींच्या केस स्टडीज आहेत. खेळाडू, लेखक, व्यावसायिक यांच्या आयुष्यातून इकिगाई कसे शोधावे ते या पुस्तकातून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. जपानी संस्कृतीतील मूल्ये, दैनंदिन सवयी आणि स्वतः चिंतन कसे करायचे, याच्या बहुमूल्य टिप्स यामुळे वाचकांना वैयक्तिक इकिगाई शोधण्यास प्रेरणा देतात. सक्रिय राहणे, हळू चालणे, पोट पूर्ण न भरणे, मित्रांसोबत राहणे, निसर्गाशी जोडले जाणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे अशा छोट्या छोट्या गोष्टींतून आपण समाधान मिळवू शकतो, हे या पुस्तकातून कळते. आवड, नैपुण्य आणि जगण्याची गरज यांचा योग्य ताळमेळ कसा साधावा हे या पुस्तकात समजावून सांगितले आहे. ज्यांना जीवनात उद्देश साध्य करायचा आहे. मानसिक शांतता हवी आहे, अशा प्रत्येकाने वाचावे असे हे प्रेरणादायी पुस्तक आहे. साधी भाषा, सुंदर मुखपृष्ठ आणि पुस्तकातील अनुकरण करावी अशी विचारसरणी यामुळे हे पुस्तक जीवन सुधारण्यासाठी वारंवार हातात घेण्याजोगे आहे.
पुस्तकाचे नाव : इकिगाई
मूळ लेखक : युकारी मित्सुहाशी
मराठी अनुवाद : मीना शेटे-संभू
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment