मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

पेशवाईवरील लेखमालेतील चौथा लेख...

मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय मुख्य फोटो
मुख्य फोटो

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' असे समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी त्याच प्रकारे एकेका मावळ्याला एकत्र करून स्वराज्यनिर्मिती केली. मुघल साम्राज्याने हरेक प्रकारे त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या निधनानंतर झालेले औरंगजेब आणि मराठे यांच्यातील स्वातंत्र्ययुद्ध इतिहासात अजरामर आहे. मराठेशाहीचा हा स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यातूनच पेशवाईचा झालेला उदय याविषयी या लेखातून जाणून घेऊ या. या लेखमालिकेतील हा चौथा लेख आहे.... 

१६४६ साली तोरणा किल्ला जिंकून घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या आपल्या ध्येयास मूर्तस्वरूप देण्यास सुरुवात केली. पुढे थोड्याच वर्षांत सिंहगड, चाकण, पुरंदर, रोहिडा, लोहगड, रायगड, राजमाची वगैरे किल्ले आणि त्या आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेऊन कल्याणपासून राजापूरपर्यंतचा प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला. अशा पद्धतीने स्वराज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी एकेक पाऊल पुढे टाकले. त्यानंतर जावळी प्रांत हस्तगत करणे, अफजलखानाचा वध, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून मुक्त होणे, कोकण भागातील दुर्ग जिंकणे असे मार्गक्रमण ते करत राहिले. त्यानंतर सुरू झाला मराठे आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष! 

१६५८ साली दिल्लीच्या तख्तावर बसताच औरंगजेबाची वक्रदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे वळाली. शिवाजी महाराजांनी १६६२मध्ये शाहिस्तेखानाला धडा शिकवला, १६६४मध्ये धनाढ्य सुरतेवर स्वारी केली. यामुळे चिडून जाऊन औरंगजेबाने जयसिंहाला मराठ्यांवर आक्रमण करण्यास पाठवले. परिस्थितीचा अंदाज घेऊन १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी तह केला. आग्र्याला कैद झाल्यावर त्यांनी आपली सुटकाही करून घेतली. महाराष्ट्रात परत आल्यावर तहात दिलेले किल्ले त्यांनी पुन्हा जिंकून घेतले. १६७०मध्ये त्यांनी सिंहगड, पुरंदर हे किल्ले जिंकले. साल्हेर-मुल्हेर किल्ले जिंकून त्यांनी मुघलांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या स्वराज्याला मान्यता देण्यास भाग पाडले. 

१६७७च्या कर्नाटक स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे १६८० साली निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये हुरूप, जोम, विश्वास, आत्मतेज निर्माण केले. स्वधर्माची आणि स्वराष्ट्राची चिंता अहर्निश बाळगून स्वार्थ आणि स्वहिताची पर्वा न करता त्यांनी राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य सहज जिंकता येईल या आशेने औरंगजेबाने १६८२मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या हिमतीने युद्ध करून मुघलांचा पराभव केला. या लढाईनंतर औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडा हे दोन प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. पुन्हा एकदा त्याने आपला मोर्चा मराठ्यांकडे वळवला. १६८९मध्ये तुळापुराजवळील वढू बुद्रुक येथे अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आले. संभाजी महाराजांच्या अशा निर्दयी मृत्यूनंतर तरी मराठे नामोहरम होतील आणि त्यांचे राज्य आपल्याला सहज जिंकता येईल असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु मराठ्यांनी पुन्हा एकदा त्याच्या या आशा धुळीला मिळवल्या. मराठ्यांनी कडवा प्रतिकार करून औरंगजेबाला जेरीस आणले. सर्व मराठे एकत्र येऊन औरंगजेबाला अक्षरश: भिडले. त्या प्रसंगी मराठ्यांमध्ये विलक्षण जोम, अपूर्व उत्साह, अलौकिक तेज व अतुलनीय देशाभिमान निर्माण झाला होता. त्यांच्या या लढ्याला तोड नव्हती.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही कामगिरी राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव व परशुराम त्रिंबक यांच्यावर सोपवली होती. याशिवाय संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मुघलांना अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात आहेत, हे समजल्यानंतर झुल्फिकार खानाने जिंजी किल्ल्यास वेढा दिला. सात वर्षे तो वेढा मराठ्यांनी लढवला. १६९८ साली मराठ्यांनी हा वेढा सोडवला. संताजी-धनाजी या जोडीने तर औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या मनात जबरदस्त दहशत निर्माण केली होती. १७०० साली राजाराम महाराजांच्या निधनानंतर पुन्हा एकदा औरंगजेबाने उचल खाल्ली. त्याने मराठ्यांचे अनेक गड-किल्ले जिंकून घेतले. परंतु राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांचे तेज कमी झाले नव्हते. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई हिच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांना पुन्हा एकदा पराभूत केले. मुघलांची पाठ फिरते न फिरते तोच त्यांनी जिंकून घेतलेले किल्ले मराठ्यांनी पुन्हा हस्तगत केले. आपण मराठ्यांच्या कचाट्यातून सुटत नाही, मराठ्यांवर राज्य प्रस्थापित करण्याची आपली इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही, हे औरंगजेबाच्या लक्षात आले. अखेर विफलता, उद्वेग, काळजी, निराशा यांमुळे जर्जर होऊन औरंगजेबाचे २० फेब्रुवारी १७०७ रोजी निधन झाले. 

अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज ते महाराणी ताराबाई असे प्रदीर्घ चाललेले हे स्वातंत्र्ययुद्ध मराठे जिंकले होते. या युद्धात त्यांनी देशप्रेम, दुर्दम्य स्वातंत्र्यइच्छा आणि देशाभिमान यांनी प्रेरित होऊन मुघलांना पराभूत केले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची मुघलांच्या तावडीतून सुटका झाली. महाराष्ट्रात आल्यानंतर सातारा येथे १७०८ साली त्यांचा राज्याभिषेक झाला. आता मराठ्यांची दोन सत्ताकेंद्रे होती, ती म्हणजे एक सातारा येथे शाहू महाराज आणि दुसरे कोल्हापूर येथे महाराणी ताराबाई. 

सातारा येथे राज्याची स्थापना झाल्यानंतर शाहू महाराज यांना जाणीव झाली, की राज्यात कोणत्याही प्रकारचे स्थैर्य नाही. महाराणी ताराबाईंच्या पक्षात असणाऱ्या अनेक मातब्बर सरदारांनी व इतर पुंडांनी शाहू महाराजांच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरुवात केली. यामुळे हे सर्व बघण्यासाठी एक उत्तम प्रशासक हवा याची जाणीव होऊन 'पेशवा' या पदाची निर्मिती झाली. दरम्यान, महाराणी ताराबाईंचा पक्ष सोडून बहिरोपंत पिंगळे शाहू महाराजांकडे आले होते. शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिले आणि कान्होजी आंग्रे यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. परंतु झाले उलटेच. कान्होजी आंग्रे यांनीच बहिरोपंत यांना पुन्हा महाराणी ताराराणीकडे वळवले. आता पेशवेपद कोणाला द्यावे, याचा विचार शाहू महाराज करू लागले. अशा परिस्थितीत बाळाजी विश्वनाथ भट यांनी हे आव्हान स्वीकारले, आंग्रे, सचिव, प्रतिनिधी अशा मोठमोठ्या सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूला वळवले. शाहू महाराजांचा उत्तम जम बसवला. १७ नोव्हेंबर १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे पेशवाई आली. 

अशा प्रकारे स्वराज्यनिर्मितीपासून स्वराज्य विस्ताराकडे मराठ्यांचा प्रवास सुरू झाला. मराठ्यांची इथपर्यंतची लढाई भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. तो आदर्श आहे संघर्षाचा, जिद्दीचा, अस्मितेचा, देशाभिमानाचा आणि राष्ट्रभक्तीचा!

(क्रमश:)

(संकलित माहिती)

.......

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 298 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 298 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words