पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उत्तर भारतात निर्माण झालेले मराठ्यांचे वर्चस्व, त्यातून तेथील काही मुघलांनी आणि इतर सरदारांनी इराणचा राजा नादिरशहा याला मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी केलेली मदत, याचा ऊहापोह पानिपतच्या लढाईविषयीच्या लेखाच्या पूर्वार्धात करण्यात आला होता. या लेखात त्यापुढील घटनाक्रम पाहू या.
इ. स. १७३८-३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले. नादिरशहाने लाहोर, सरहिंद प्रांत जिंकले आणि तो दिल्लीपर्यंत येऊन पोहोचला. मुघल बादशहाने त्याच्याशी लढण्याचा निष्फळ प्रयत्न केला. एकीकडे, आपण इस्लाम वाचवण्यासाठी दिल्लीवर आक्रमण करतोय, असा समज नादिरशहाने हिंदुस्थानातील इतर इस्लामिक शासकांमध्ये निर्माण केला. यात काफर हिंदूंना मारणार असे चित्र त्याने निर्माण केले. दुसरीकडे, बादशहाचा लढाईचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर मात्र नादिरशहाने त्याच्याकडे पाच कोटी खंडणीची मागणी केली. बादशहाने एवढी मोठी रक्कम खंडणी म्हणून देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर नादिरशहाने बादशहाचा सारा खजिना लुटला. मयूरसिंहासन, कोहिनूर हिरा ही मुघलांची मानचिन्हे असणाऱ्या वस्तू त्याने स्वत:च्या ताब्यात घेतल्या. दिल्लीतील सर्वधर्मीय लोकांची घरे खणली. अशा प्रकारे जवळपास १५ कोटी रुपयांची लूट त्याने केली. इतकेच नाही, तर दिल्लीच्या आसपासची बहुतांश प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त केली. जवळपास १५ हजार संन्याशांची कत्तल त्याने केली. हे सगळे बादशहाच्या आवाक्याबाहेर जात होते. सरतेशेवटी मुघल बादशहाने मराठ्यांना रक्षणासाठी येण्याची विनवणी केली. मराठ्यांनी मदतीची याचना मान्य केली. नादिरशहा हा परकीय आहे, त्याने भारतावर केलेले हे आक्रमण आपल्या सार्वभौमत्वावर केलेले आक्रमण आहे, या विचाराने बाजीरावांनी दिल्लीकडे कूच केले. बाजीरावांच्या पराक्रमाची महती नादिरशहाला माहीत होती. त्याच्याकडून पराभूत होण्यापेक्षा १५ कोटींची लूट आणि इतर सामान घेऊन मायदेशी परत जावे असा विचार त्याने केला. हा नादिरशहा परत जाताना मात्र तसाच गेला नाही. त्याने दिल्लीतील १५ ते १७ हजार तरुण स्त्रियांना बळजबरीने आपल्याबरोबर नेले.
त्यानंतर मधल्या काळात बाजीरावांचे निधन झाले. नानासाहेब म्हणजेच बाळाजी बाजीराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. पेशवे होताच त्यांनी बंगाल, बिहार, आसाम, उडीसा हे प्रांत काबीज केले. जाट, रजपूत यांना पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व मानायला लावले. इकडे नादिरशहाने तोपर्यंत अफगाणिस्तानावर आपले राज्य प्रस्थापित केले होते. आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर त्याने तिथे आपले शासक म्हणून काही सरदारही नेमले. नादिरशहाची हत्या झाल्यावर त्या सरदारांतील एक तरुण सरदार अहमदशहा अब्दाली याने बंड पुकारले. अफगाणिस्तान मुक्त केले. तो अफगाणिस्तानचा सुलतान बनला. नादिरशहाच्या काळात म्हणजे १७३८मध्ये तो हिंदुस्थानात येऊन गेला होता. त्याला येथील संपन्नतेची कल्पना होती. अफगाणिस्तानच्या उजाड, विराण जमिनीच्या तुलनेत भारताची संपन्नता कैक पटींनी जास्त होती. त्यामुळे तो हिंदुस्थानवर आक्रमण करण्याच्या तयारीत होताच. उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वाचा द्वेष करणारे रजपूत, अंतर्वेदीतले पठाण, रोहिले, बंगश होते. ते मराठ्यांना आवाहन कधी देता येईल, या संधीची वाटच पाहत होते. या सगळ्या परिस्थितीत अब्दालीने १७४८मध्ये हिंदुस्थानवर पहिल्यांदा स्वारी केली. तेव्हा त्याला मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या या सर्वांनी उघडपणे मदत केली. त्यात सर्वांत पुढे होता नजीबखान रोहिला. हा नजीबखान एका बंगश घराण्यात नोकरीला होता. नंतर तो मुघल दरबारात सरदार झाला.
अब्दाली लाहोर, सरहिंद जिंकत दिल्लीपर्यंत आला. मीनपूर येथे जी चकमक झाली, तिथे त्याला माघार घ्यावी लागली. 'आता ही लढाई पुढे नेणे आपल्याला जड जाईल, तेव्हा आणखी तयारीनिशी पुन्हा हिंदुस्थानावर चढाई करावी,' या विचाराने तो माघारी फिरला. जाताना अब्दालीने आताच्या पाकिस्तानातील काही भाग जिंकून तो आपल्या साम्राज्याला जोडला. आपले अधिकारीही तिथे प्रशासक म्हणून नेमले. या सगळ्या लढाईत मुघल बादशहाच्या हे लक्षात आले, की उत्तर भारतातील सरदार आपल्याला हवी तशी मदत करत नाहीयेत. नजीबखानानेसुद्धा अब्दालीला मदत करून मुघालांविरुद्ध बंडच केले आहे. आता पुन्हा एकदा मुघलांनी मराठ्यांकडे मदत मागितली. नजीबखानाने केलेले बंड मोडून काढण्यासाठी व इतर सरदारांना धडा शिकवण्यासाठी होळकर मुघलांच्या मदतीला धावून गेले. या मदतीच्या बदल्यात मराठे आणि मुघल यांच्यात जो तह झाला तोच प्रसिद्ध 'अहदनामा' होय. या तहाअंतर्गत मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून मुघलांचे रक्षण करायचे, मुघलांविरुद्ध बंड करणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त करायचा, असे ठरले. या बदल्यात मराठ्यांचे २५ हजार सैन्य दिल्लीत तैनात राहणार आणि त्यांचा सर्व खर्च बादशहा करणार हे पक्के झाले. याशिवाय संपूर्ण हिंदुस्थानातील चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मराठ्यांना मिळाला. या प्रदेशात अब्दालीच्या ताब्यात असलेल्या पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान यांचाही समावेश होता.
या सगळ्या परिस्थितीमुळे मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्या नव्या संघर्षाची बीजे रोवली गेली. खरे तर अहमदशहा अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ यांच्यात पानिपतची लढाई होण्याआधी तहाची बोलणी झाली होती. परंतु अब्दालीने तहासाठी ज्या अटी ठेवल्या होत्या त्यामुळे भारताच्या अखंडतेसाठी धोका निर्माण झाला असता. त्या मान्य केल्या असत्या, तर मुघलांशी एकप्रकारे विश्वासघात केल्यासारखे झाले असते. मराठे आपल्या शब्दाला जागणारे होते. दिल्लीच्या बादशहाला त्यांनी परकीय आक्रमणापासून संरक्षणाचा शब्द दिला होता. पुढे १७६१मध्ये झालेली पानिपतची लढाई हे वरील संघर्षाचे मूर्त स्वरूप होते. हा लढा फक्त मराठे आणि अब्दाली यांच्यातील नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वासाठी केलेला संघर्ष होता. मराठे हिंदुस्थान म्हणजे भारतासाठी लढले.
पुढे पानिपतची लढाई कशी झाली, त्यात कोणत्या आणि कशा घडामोडी झाल्या हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच 'मराठे पानिपतात हरले' असे म्हणणे म्हणजे मराठ्यांच्या शौर्याला, अस्मितेला नाकारण्यासारखे आहे. याउलट मराठ्यांनी त्यांच्या एकूण संघर्षातून एक उत्तम संदेश भारतीयांना दिला आहे, तो म्हणजे - 'अडचणीच्या प्रसंगी खचून न जाता प्राप्त कर्तव्य करत राहणे, हीच जिवंत राष्ट्राची खूण आहे.' पानिपत लढाईनंतर हीच भावना महाराष्ट्राने जगाच्या निदर्शनास आणली!
(संदर्भ : प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची मीमांसा 'फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज'साठीची मुलाखत)
या लेखाचा पूर्वार्ध वाचा पुढील लिंकवर...
पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध
या विषयावरचा आधीचा लेख वाचा पुढील लिंकवर...
पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment