पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

पानिपतची ऐतिहासिक लढाई झाली, तो दिवस होता १४ जानेवारीचा... त्या निमित्ताने, या लढाईची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध

पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध मुख्य फोटो
मुख्य फोटो

पानिपतच्या रणसंग्रामाला २६०हून अधिक वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही आपल्याला ही लढाई संवेदनशील वाटते. 'दोन मोत्ये गळाली, दहा अश्रफी गेल्या, खुर्द्या पैशांची तर गणनाच नाही' ही ओळ म्हणजे पानिपताच्या लढाईची वेदनाच आहे. जवळजवळ एक लाख मराठ्यांना पानिपतच्या लढाईत वीरमरण प्राप्त झाले. 'मराठ्यांचे पानिपत झाले' हा शब्दप्रयोग सर्रास केला जातो. मराठे त्या तात्पुरत्या लढाईत हरले असतील; पण म्हणून त्यांचा पूर्ण पराभव झाला नव्हता. मुळात मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्या साम्राज्याच्या सीमा लागून नव्हत्या. मग त्यांच्यात हा संघर्ष का झाला? मराठे महाराष्ट्रात आणि अहमदशहा अब्दाली इराणचा... मराठ्यांचे साम्राज्य माळवा, बुंदेलखंड इथपर्यंतच होते व अब्दाली भारताच्या उत्तरेत होता. मग ही लढाई झालीच कशी आणि का? या लढाईचे कारण होते भारत... हिंदुस्थान... हा संघर्ष होता भारताच्या सार्वभौमत्वासाठी.

पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपल्याला लढाईच्या ५४ वर्षे मागे जावे लागेल. २० फेब्रुवारी १७०७ रोजी मुघल बादशहा औरंगजेब मरण पावला. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर अधिराज्य मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी झाला नाही. या निराशेतच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर मुघलांमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष झाला. इ. स. १७०७ ते १७१९पर्यंत अनेक मुघल शासक सत्तेसाठी एकमेकांशी भांडले. सन १७१९मध्ये औरंगजेबाच्या दरबारात मानाचे स्थान असणाऱ्या सय्यद बंधूंनी 'फरुकशियर' या तरुणास बादशहा म्हणून घोषित केले. आपल्याला तख्तावर बसवून प्रत्यक्षात सय्यद बंधूच शासन चालवत आहेत, हे फरुकशियरच्या लक्षात येताच त्याने सय्यद बंधूंविरुद्ध बंड पुकारले. आता नवीन बादशहा तख्तावर बसवण्यासाठी सय्यद बंधूंना जास्तीचे सैन्य लागणार होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडे मदतीची याचना केली. मराठ्यांनी ही एक उत्तम संधी मानली आणि दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणासाठी पेशवे बाळाजी विश्वनाथ व खंडेराव दाभाडे यांनी दिल्लीकडे कूच केले. तिथे झालेल्या लढाईत सय्यद बंधू आणि मराठे यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. नवीन शासक नेमला. या मोबदल्यात मराठ्यांना मुघलांच्या ताब्यातील दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी मिळाली. हिंदवी स्वराज्याला बादशहाकडून मान्यताही मिळाली. या सनदांच्या आधाराने बऱ्हाणपूर ते कन्याकुमारीमध्ये हक्क मिळाले. अशा प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १२ वर्षांतच मराठे दिल्लीच्या तख्ताचे 'किंगमेकर' ठरले.

दरम्यान, इ. स. १७२०मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या निधनानंतर त्यांचे २१ वर्षे वय असलेले पुत्र थोरले बाजीराव पेशवे झाले. बाजीरावांनी आपल्या शौर्याने माळवा, बुंदेलखंड जिंकले. मराठ्याच्या सत्तेचा विस्तार केला. मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उधोजी पवार, पिलाजी जाधवराव या नवीन सरदारांना संधी दिली. त्यातून बाजीरावांचा तेथील मुघल शासकांशी संघर्ष सुरु झाला. सन १७३७मध्ये बाजीरावांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. त्या वेळी दिल्लीत मुघल शासकांमध्ये दोन गट निर्माण झाले होते. एक गट मराठ्यांना सहकार्य करण्यास तयार होता, तर दुसऱ्या गटाला मराठ्यांचे हे वाढते वर्चस्व मान्य नव्हते. त्यात एक गट होता राजपूतांचा... विशेषत: जयपूरचा माधोसिंग आणि जोधपूरचा उधोसिंग. यापूर्वी अकबराने या राजपूतांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. यामुळे राजपूत स्वत:ला मुघलांचे रक्षक मानू लागले होते. आता त्यांच्या या वर्चस्वाला मराठ्यांमुळे सुरुंग लागला होता. म्हणून त्यांना मराठ्यांचे वर्चस्व खुपत होते. हा एक भाग होता.

मराठ्यांचे हे वर्चस्व मान्य नसलेला आणखी एक गट म्हणजे अफगाणी. मुघल भारतात येण्याअगोदर अफगाण शासकांचे भारतावर राज्य होते. मुघल मूळचे तुर्कस्तानातले. बाबराच्या पूर्वजांनी तुर्कस्तानात जाऊन तिथे सत्ता प्रस्थापित केली होती. बाबराला दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी अफगाणी लोकांविरुद्ध लढावे लागले. तेव्हा पठाण, रोहिले या अफगाणिस्तानी सरदार वंशजांनी गंगा-यमुना खोरे म्हणजेच 'अंतर्वेदी' किंवा 'दुआब' भागात वास्तव्य केले. त्यांनी मुघल शासन मान्य केले असले, तरी पराभवाचे हे शल्य त्यांना होतेच. मुघलांचा पराभव होऊन पुन्हा अफगाणी शासन यावे असे त्यांना वाटत होते. याशिवाय खुद्द मुघलांच्या साम्राज्यात दोन तट होते. त्यातील एक तट मराठ्यांविरुद्ध होता. या सगळ्या पार्श्वभूमीतून उत्तरेत काही नवीन समीकरणे उदयास आली.

या सगळ्या दबकून होणाऱ्या घटनांची खबर मध्य आशियातील इराणी राजा नादिरशहा याच्या कानी पडली. तो पराक्रमी तर होताच, शिवाय राजकारणाचा उत्तम जाणकार होता. या सगळ्या द्वेषातून दुबळे झालेले मुघल साम्राज्य आपण सहज जिंकून घेऊ, या आशेने त्याने दिल्लीवर आक्रमण केले. त्याला वाटले आपण दिल्ली सहज काबीज करू. भारतातील मुघलांचे शासन नको असलेल्या आणि मराठ्यांचे वर्चस्व सहन न होणाऱ्या काही सरदारांनी नादिरशहाच्या या मनसुब्याला साथ दिली. अशा प्रकारे नादिरशहा आणि मराठे यांच्या संघर्षाची ठिणगी पडली.

नादिरशहाने दिल्ली काबीज केली का, इ. स. १७५२चा प्रसिद्ध अहदनामा नेमका कसा होता, मराठ्यांचे वर्चस्व कसे प्रस्थापित झाले, आणि पुढे हा संघर्ष पानिपतच्या लढाईपर्यंत कसा पोहोचला, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखाच्या उत्तरार्धात.

(संदर्भ : प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची मीमांसा 'फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज'साठीची मुलाखत)

या लेखाचा उत्तरार्ध वाचा पुढील लिंकवर...

पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

या विषयावरचा आधीचा लेख वाचा पुढील लिंकवर...

पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 06:25 PM News publication time | Views: 1,317 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 06:25 PM News publication time | Views: 1,317 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

G
Gajanan wasudev phadke
20-01-2026 09:58 PM

छान माहितीपूर्ण एतेहासिक उजाळा देणारा लेख

M
Milind Kulkarni
20-01-2026 09:43 PM

उत्तम माहितीपूर्ण लेख!!🕉️

Write a Comment
0 / 50 words