उत्तर महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध शिवमंदिरे

स्थापत्यकला, संस्कृती, पुराणकथा यांचा संगम असलेल्या या मंदिरांविषयीची थोडक्यात माहिती देणारा लेख... महाशिवरात्रीनिमित्त...

उत्तर महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध शिवमंदिरे मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहं शिवः शिवश्चार्य, त्वं चापि शिव एव हि। 

सर्व शिवमयं ब्रह्म, शिवात्परं न किञचन॥

मी शिव आहे, तुम्हीसुद्धा शिव आहात, हे सारे ब्रह्मांड शिवमय आहे. शिव हाच साऱ्या शक्तींचा स्रोत आहे. भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असे संबोधले जाते. समुद्रमंथनातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठवल्यामुळे त्यांना नीलकंठ किंवा नीलग्रीव म्हटले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्र-पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणूनदेखील ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. 

भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत. देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जिथे-जिथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी स्थापित झाले. त्यांनाच ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. नाशिक जिल्ह्यातही त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. परंतु नाशिक जिल्ह्याच्या आसपासच्या भागात किंवा उत्तर महाराष्ट्रात अनेक प्राचीन आणि अद्भुत अशी शिवमंदिरे आहेत. त्यातील काही प्रसिद्ध शिवमंदिरांची माहिती या लेखातून देत आहोत.

कपालेश्वर मंदिर, नाशिक : गोदाघाटावरील प्रसिद्ध रामकुंडापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इतर शिवमंदिरांसारखी या मंदिरात नंदीची मूर्ती स्थापित केलेली नाही. याची एक आख्यायिका अशी सांगितली जाते, की एकदा भगवान शंकरांच्या हातून चुकून गोहत्या झाली. या पापाचा नाश व्हावा म्हणून नंदीने त्यांना गोदावरी नदीत स्नान करण्याचा उपाय सुचवला. त्याप्रमाणे शंकरांनी गोदावरी नदीत स्नान केले आणि तिथेच तपश्चर्येला बसले. नंदीच्या सूचनेनुसार त्यांनी हे पापक्षालन केले. या वेळी नंदी त्यांचा गुरू होता. तिथे नंदी त्यांचा सेवक नव्हता. म्हणून कपालेश्वर मंदिरात आधी नंदीची मूर्ती नाही. अतिशय सुंदर आणि पुरातन असे हे मंदिर खूप सुंदर आहे. गंगाघाटावर, रामकुंडावर येणारा प्रत्येक भाविक या मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेतोच. श्रावणी सोमवारी या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विशेष पूजा-अर्चा केली जाते. 

सोमेश्वर मंदिर, नाशिक : नाशिक शहरापासून अगदी जवळ अशा आनंदवल्लीया परिसरात हे मंदिर आहे. अतिशय रम्य आणि सुंदर परिसरातील या मंदिराचे महत्त्व नाशिककरांसाठी अनन्यसाधारण आहे. या मंदिरातून संथ वाहणाऱ्या गोदावरी नदीची भव्यता डोळ्यांत भरते. सोम म्हणजे चंद्र आणि ईश्वर असे हे सोमेश्वर रूप इथे पाहायला मिळते. या मंदिराची निर्मिती चोल काळात झालेली असावी. मंदिराचे स्थापत्य अतिशय सुंदर आहे. कुंभमेळा आणि महाशिवरात्री अशा काही विशेष काळात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. मंदिरात भगवान शंकराची उपासना करून काही काळ गोदावरी नदीकाठी शांतपणे बसून निसर्ग आणि अध्यात्म यांतून मिळणारी मन:शांती एक वेगळाच अनुभव देते. 

गोंदेश्वर मंदिर-सिन्नर-नाशिक : नाशिकपासून ३० किलोमीटर दक्षिणपूर्व नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरपासून अगदी जवळ हे मंदिर उभारलेले आहे. साधारण १२-१३व्या शतकात यादव कालखंडात या मंदिराची निर्मिती झालेली असावी. यादव कुळातील राजा राजगोविंद याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. हेमाडपंती पद्धतीच्या स्थापत्यकलेने या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. काळा बेसाल्ट आणि चुनखडीपासून बनलेल्या मंदिरात कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती सुंदर आखीव आणि अप्रतिम आहेत. या मंदिर परिसराला शिवपंचायतन किंवा पाच मंदिरांचा समूह म्हणतात. भगवान शिवाच्या मंदिराव्यतिरिक्त श्री पार्वती, गणपती, भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांचीही मंदिरे याच परिसरात आहेत. कूर्म या विष्णू अवताराच्या मूर्ती इथे कोरल्या आहेत. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर नक्की बघायला हवे. 

सिद्धेश्वर चांगदेव मंदिर, मुक्ताईनगर, जळगाव : तापी आणि पूर्णा आणि गुप्त गंगा अशा त्रिवेणी नदीसंगमावर हे मंदिर बांधलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गावातील या मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक आहे. मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिर परिसरात अनेक सुंदर रेखीव मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुशोभित आहे. दगडावरचे नक्षीकाम अतिशय अप्रतिम आहे. 

श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर : चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्या स्थानाचा महिमा असा आहे, की भोज राजा विक्रम याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन ह्याने आपली मुलगी चंद्रकला हिचा विवाह राजा विक्रमाशी याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. मुघलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला. त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले. बाबांनी हा भाग स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मूर्तींमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभाऱ्यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर गणेश टाके आहे. बारमाही पाणी हे या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य आहे. तेथील उत्सावात गावातून पालखी निघते. पालखीत भगवान शिवाचा चांदीचा मुखवटा, शेषनाग, बाबांची, प्रतिमा, दागिने, ठेवतात. या वेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात. श्रावणात एक लक्ष बिल्वदले ‘ओम नम: शिवाय’ या जपाने शिवलिंगावर वाहतात. तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करतात. 

माणकेश्वर मंदिर : धुळ्यापासून साधारण ३० किलोमीटरवर असणाऱ्या झोडगे गावात हे मंदिर आहे. या मंदिरात खूप सुंदर शिल्पे आहेत. नागर शैलीत हे बांधकाम केलेले आहे. मानवी जीवनातील विविध अवस्था, विविध कला, शिल्पे, पौराणिक आणि बोधकथा हे सारे या मंदिरातील शिल्पातून दिसतात. फक्त भाविकच नाही तर स्थापत्यकलेची आवड असणारे, ती कला शिकणारे यांनी इथे नक्की भेट द्यावी असे हे मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त इथे उत्सव होतो. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. 

हरिहरेश्वर मंदिर, पिंपळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा व डुब्बा या नद्यांचा संगम ही प्राचीन तपोभूमी असल्याचा उल्लेख अनेक पुराणांत आढळून येतो. या ठिकाणी पुरातकालीन हरिहरेश्वर महादेव मंदिर असून, या ठिकाणचा उल्लेख स्कंदपुराण, नवनाथ, शिवपुराण, शिवलीलामृत, श्रीमद्भागवत पुराण आदी प्राचीन ग्रंथांत वाचायला मिळतो. प्रभू श्रीराम आपल्या वडिलांचे उत्तरकार्य नाशिक येथून आटोपून पुढच्या प्रवासाला निघाले असता वाटेत पिंपळगाव हरेश्वर या गावी बहुळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर थांबले . तिथे भगवान शंकर तपश्चर्या करत होते. भगवान शंकर व प्रभू श्रीराम यांची भेट याच ठिकाणी झाली. प्रभू श्रीराम हे विष्णूचा अवतार त्यामुळे विष्णू व शंकर यांच्या भेटीचे ठिकाण म्हणून ही जागा हरिहर नावाने ओळखली जाते. पुराणात या गावाचा उल्लेख ‘पिप्पलग्राम हरिहरेश्वर’ असा आढळतो. भस्मासुराचा वध झाला ती जागा असा या ठिकाणचा उल्लेख पुराणात येतो. त्याचं प्रतीक म्हणून येथे ‘भस्मासुराची शिळा’ आहे. पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वराचे मंदिर १२९७ला बांधले असे हेन्री कोसेन्स या इंग्रज प्रवाशाने लिहून ठेवले आहे. हरिहरेश्वर असे नाव असल्याने शंकराच्या पिंडीत विष्णू आणि शंकर अशी दोन्ही रूपे आहेत. 

उत्तर महाराष्ट्रातील ही काही निवडक शिवमंदिरे आहेत. ही शिवमंदिरे स्थापत्यकला, पुराणकथा, आपली प्राचीन संस्कृती यांची प्रतीके आहेत. येथील शिल्पे, नक्षीकाम आपल्याला अबोलपणे खूप काही सांगून जाते. या मंदिरांचे आणि त्यातून आपल्या संस्कृतीचे जतन करणे ही आपलीच जबाबदारी आहे. तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची, परंपरेची कल्पना येईल. 


(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words