श्री समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले, तेजस्वी वारसा जपणारे धर्मपीठ
भंडारा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेला श्री समर्थ रामदासी मठ हे समर्थ रामदासस्वामींच्या परंपरेचा तेजस्वी वारसा जपणारे धर्मपीठ आहे. ठोस कागदपत्रे नसली, तरी समर्थांच्या १६३२–१६४४च्या तीर्थाटन काळात अंदाजे १६४०–१६४४च्या दरम्यान या मठाची स्थापना त्यांनी केली असावी, असे मानले जाते. भारतभर मठस्थापना करणाऱ्या समर्थांनी विदर्भातील माहूर, कारंजा, वाशिम, पवनी, अचलपूरसह भंडाऱ्यातही अध्यात्मदीप प्रज्ज्वलित केला. स्थापनेवेळी आणलेली काळ्या पाषाणातील श्रीराम-सीतेची चक्रांकित मूर्ती, खडावा व पूजासाहित्य आजही जतन करण्यात आले असून, हा वारसा यादवकालीन शैलीची साक्ष देतो. हा मठ वंशपरंपरागत नसून, शिष्यपरंपरागत आहे. श्री गोविंद गुरू, श्री लक्ष्मण गुरू व श्री गणपतराव गुरू महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. त्यांच्या तेजस्वी जीवनकथांनी मठ अधिक पावन झाला. गणपतराव महाराजांचे अद्वितीय धैर्य, विरक्ती आणि रामनामातील अखंड साधना भाविकांना प्रेरणा देते. संतश्रेष्ठ गजानन महाराज, तुकडोजी महाराज आदी संतांची पावन पायधूळही या स्थळावर पडलेली आहे.
श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री समर्थ रामदासी मठ हा भंडाऱ्याच्या नरकेसरी वॉर्डातील, शहराच्या मध्यभागी वसलेले पवित्र आणि प्राचीन धर्मपीठ आहे. गजबजाटाच्या वातावरणातही येथे भक्तांना शांतता, समाधान आणि आध्यात्मिक प्रसन्नता लाभते. ही वास्तू केवळ पूजास्थान नसून धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचा जिवंत वारसा आहे. कीर्तन, भजन व उत्सवांनी नित्य भक्तिरसात न्हालेला हा मठ श्रद्धा आणि संस्कारांचे केंद्रस्थान ठरतो. मठाच्या स्थापनेविषयी ठोस कागदपत्रे उपलब्ध नाहीत. कै. विनायकराव वैद्य यांच्या १९४०मधील लेखनानुसार हा मठ सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा मानला जातो; मात्र अचूक वर्ष नमूद करण्यात आलेले नाही.
तीर्थाटनाच्या निमित्ताने समर्थांनी देशभर मठस्थापना केली. हनुमंतस्वामीकृत बखर, दासविश्राम व विद्यामठ ग्रंथांत त्यांच्या प्रवासाचा क्रम दिला आहे. टाकळी–नाशिक–प्रयाग या प्रवासात त्यांनी विदर्भातील माहूर, कारंजा (लाड), वाशीम, पवनी व अचलपूर येथे मठ स्थापन केले. रामटेकचा शिवराम मठ, अचलपूरचा भोळाराम मठ आणि भंडाऱ्याचा मारुती महाराजांचा मठ ही त्याची साक्ष आहेत. भंडाऱ्यात मठ स्थापन करून समर्थ कुही तालुक्यातील आंभोरा तीर्थावरही गेले, असा उल्लेख आढळतो. त्यांच्यासमवेत कल्याणस्वामींसह अकरा पट्टशिष्य होते. स्थापनेवेळी आणलेली श्रीराम-सीतेची काळ्या पाषाणातील चक्रांकित मूर्ती, खडावा व पूजासाहित्य आजही मठात जतन करण्यात आलेले आहे. तसेच अष्टधातूंच्या व उत्सवमूर्तीही आहेत. “जागोजागी मठस्थापना करून बसविले जानकीरमणा” या आरतीतील ओळीप्रमाणेच हा वारसा तेजोमय आहे. मूर्तीची घडण यादवकालीन शैलीची भासते.
मठातील देवघरातील सिंहासनावर श्रीराम-सीतेच्या चक्रांकित शालिग्राम, छत्रधारी, तंजावर शैलीतील आणि दोन भक्तांनी अर्पण केलेल्या अशा पाच युगल मूर्ती विराजमान आहेत. हा मठ वंशपरंपरागत नसून शिष्यपरंपरागत आहे. या मठातील देवघरात तीन सत्पुरुषांच्या पवित्र समाध्या आहेत. आजही त्या भक्तांना दृष्टान्त देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकटकाळी स्वप्नातून मार्गदर्शन मिळते, अडचणी सुटतात, असे अनेकांचा अनुभव सांगतो. पूजा-अभिषेक व नवसाने केलेल्या भक्तीला योग्य फळ मिळते, अशी अखंड विश्वासाची परंपरा येथे जिवंत आहे.
देवघरातील सिंहासनासमोर प्रथम क्रमांकाची समाधी श्री गोविंद गुरू महाराजांची आहे. सुमारे सहा फूट उंच, धिप्पाड देहयष्टी, गौरवर्ण, जटाधारी व दाढीधारी असे ते ब्रह्मचारी संत होते. त्यांचा तेजस्वी चेहरा रवींद्रनाथ टागोरांची आठवण करून देई. त्यांचा फोटो उपलब्ध नाही. त्यांच्यापूर्वी श्री मारोती महाराज होते; मात्र त्यांची समाधी येथे नाही. सिंहासनामागील खोलीत चौकोनी ओट्यावर ते विराजमान होत. पुढे श्री आबाजी दाढी यांच्याकडे कारभार आल्यावर त्यांनी तो ओटा काढल्याने त्यांच्यावर काही विपरीत प्रसंग ओढवले, अशी परंपरागत कथा सांगितली जाते; पण ईश्वरकृपेने सर्व सुरळीत झाले.
द्वितीय क्रमांकाची समाधी श्री लक्ष्मण गुरू महाराजांची आहे. मध्यम बांधा, विदेही वृत्ती व ब्रह्मचर्यव्रत असे त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. ते स्वतःला मारुती म्हणवीत. त्यांना पुच्छ असल्याने लोक त्यांना हनुमंताचा अवतार मानत असत. त्यांचा फोटो मठात जतन आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट, बैतूल, खंडवा, तसेच विदर्भातील बुलढाणा, भंडारा व नागपूर येथे त्यांचा मोठा शिष्यपरिवार होता. रोज सकाळ-संध्याकाळ ते अकरा मारुतींचे दर्शन घेत. मठासमोरील झोपडीत ते एकांतवास करीत (सध्या तेथे दत्तात्रय चेपे यांचे घर आहे). त्यांच्या पट्टशिष्यांपैकी श्री गणपतराव बक्षी यांना त्यांनी दृष्टान्त देऊन मठात बोलावून घेतले, अशी कथा सांगितली जाते.
तिसऱ्या क्रमांकाची समाधी श्री गणपतराव गुरू महाराजांची आहे. बक्षी आडनावाचे हे उंच, सुदृढ व्यक्तिमत्त्व बालाघाट जिल्ह्यातील रामपायली येथे प्राथमिक शिक्षक होते. उत्तम सतारवादक, गळ्यात तुळशीमाळ आणि ओठांवर अखंड 'श्री राम जय राम जय जय राम' मंत्र... त्यांची मुद्रा नेहमी ध्यानमग्न असे. ते अखंड रामनाम लेखनही करीत. संसारी असूनही पूर्ण विरक्त, अपेक्षारहित व राममय , समर्थमय जीवन ते जगले. परमार्थातील अधिकारी पुरुष म्हणून त्यांचा मान आहे. आजही समाधीतून ते भक्तांना दृष्टान्त देतात, अशी दृढ श्रद्धा भाविकांत आहे. श्री गणपतराव गुरू महाराजांना दामोदर नावाचा एकुलता एक पुत्र होता. १९१६च्या एन्फ्लुएंझा साथीत त्याचे निधन झाले; तरीही महाराज अढळ धैर्याने स्थिर राहिले. तिरडी उचलताना ते म्हणाले, “दामोदर, आम्हीही तुझ्यामागून येतो.” दोन दिवसांत सुनेचाही देहान्त झाला. तेव्हा ते शांतपणे उच्चारले, “आता आमची काळजी संपली.” आश्विन वद्य दशमीला शिष्यांना सांगितले, “उद्या माध्यान्ही आम्ही देह ठेवू; रामनामाचा गजर करा.” आणि आश्विन वद्य एकादशी, १९१७ या दिवशी त्यांनी समाधी घेतली. नागपूरच्या आप्पाजी गांधींच्या पत्नी लक्ष्मीबाई गांधी (त्यांच्या शिष्या) यांनी त्यांची समाधी बांधली.
पूर्वीच श्री लक्ष्मण गुरू महाराजांनी स्वप्नदृष्टान्त देऊन मठाची जबाबदारी त्यांच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार गणपतराव महाराजांनी नोकरीचा राजीनामा देऊन मठाचा कारभार स्वीकारला. श्री वैद्य, नानीबाई व दाढी, देवगडे, कुंडले, त्रिवेदी, ढगे, दिवाळेबाई, आंधारे, फडणवीस, आंभोरकर, वैद्य, आबाजी दाढी, मुजुमदार, बारापात्रे, अंधारे, अडबे मास्तर, अप्पाजी व लक्ष्मीबाई गांधी अशा असंख्य भक्तांचा श्री गणपतराव गुरू महाराजांना लाभलेला शिष्यपरिवार मोठा होता; अनेकांची नावे आज काळाच्या पडद्याआड गेली आहेत.
त्यांच्या काळात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी या मठात पायधूळ झाडली. महाराजांचे एक शिष्य मनरो शाळेत शिक्षक होते. अडवे मास्तर व आपल्या शिष्यासह परमपूज्य साक्षात श्री गजानन महाराज इथे आले. पुढे श्री तुकडोजी महाराज, श्री गुरू सीताराम महाराज, गौरीशंकर महाराज, दामोदर महाराज, लहरी महाराज आदी संतांनी मठात भेट देऊन वास्तव्य केले. १९७७मध्ये श्री दिनकरराव काटे स्वामी यांचाही येथे काही दिवस मुक्काम झाला. यातून मठाची संतपरंपरा अधिकच पावन झाली.
श्री गोविंद गुरू, श्री लक्ष्मण महाराज, श्री गणपतराव गुरू महाराज आणि विनायकराव वैद्य महाराज हे नित्य माधुकरी मागून आणलेला नैवेद्य देवाला अर्पण करत. पुढे ही पवित्र परंपरा हळूहळू थांबली. सध्या मठातील पुजारी आपल्या घरचाच नैवेद्य दाखवितात. रामनवरात्र व दासनवमीला काही काळ भिक्षापद्धती चालू होती; पण आता तीही खंडित झाली आहे. कारण विद्यमान पुजारी हे वृद्धत्वामुळे अशक्त झाले आहेत.
१९१७ साली श्री गणपतराव गुरू महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर एक मे १९४०पर्यंत विनायकराव (भगोरे) वैद्य यांनी मठाचा कार्यभार सांभाळला. पुढे १९५२पर्यंत गंगूबाई वैद्य, त्यानंतर पाच डिसेंबर १९५६पर्यंत रामभाऊ मुजुमदार यांनी जबाबदारी पार पाडली. जुलै १९५७मध्ये रामभाऊंच्या निधनानंतर शिष्यपरिवारातील कनिष्ठ शिष्य आबाजी दाढी यांच्याकडे कारभार आला. जनपदातील हिशेबनीस पदावरून १९५३मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने पूर्णवेळ मठसेवा केली. १४ सप्टेंबर १९८८ रोजी हरतालिकेच्या दिवशी ते ब्रह्मलीन झाले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र व शिष्य गोपाळ उर्फ नाना दाढी राजस्व अधिकारी पदावरून ३१ ऑगस्ट १९८८ रोजी निवृत्त झाले. ते मठाचा कार्यभार सांभाळत आहेत. पत्नीचे २१ डिसेंबर १९९० रोजी निधन झाले. त्यानंतरही भावंडे व सुनांच्या सहकार्याने ते उत्सव, उपासना व पूजा-अर्चा अखंडपणे चालवत आहेत.
३० मार्च १९८५ रोजी श्रीरामनवमीच्या पावन दिवशी समर्थांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानेगावचे मूर्तिकार सेलोकर गुरुजी यांनी तो साकारला. त्याचा संपूर्ण खर्च द. ना. वैद्य यांनी उचलला. मूळ भंडाऱ्याचे, लाखनी येथील समर्थ विद्यालयातील शिक्षक असलेल्या वैद्यांना अपत्य नव्हते; पत्नीच्या निधनानंतर समर्थांची मूर्ती मठात बसविण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली.
मठात वर्षभर उत्सवांची भक्तिमय परंपरा अखंड सुरू असते. श्रीरामनवमी, हनुमान जयंती, दासनवमी, व्यासपौर्णिमा, तसेच श्रावण महिनाभर चक्री भजन रंगते. आश्विन वद्य प्रतिपदेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा मंगल निनाद घुमतो. आश्विन वद्य एकादशी-द्वादशीला श्री गणपतराव गुरू महाराजांची, कार्तिक वद्य नवमीला श्री लक्ष्मण गुरू महाराजांची आणि फाल्गुन वद्य अष्टमीला श्री गोविंद गुरू महाराजांची पुण्यतिथी अभिषेक, आरती, भजनाने साजरी होते. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या दासनवमी उत्सवात दासबोध वाचन, कीर्तन-प्रवचन, तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पवमान-रुद्र अभिषेक, रामायण पारायण व सांप्रदायिक मालिकांनी मठ परिसर सतत भक्तिरसात न्हाऊन निघतो.
श्री भास्करबुवा देवरस, विठ्ठलबुवा देवरस, आबासाहेब साल्पेकर, गजाननबुवा मराठे, राजाभाऊ दिग्रसकर, नानाबुवा शिंदखेडकर, कल्याणबुवा रामदासी, नाशिककरबुवा, विश्वनाथबुवा, जोशी, ऋक्मांगदबुवा आदी कीर्तनकारांनी मठात भक्तिरंग भरला. तसेच गोडसेबुवा, मुकुंदस्वामी गोरे, धर्माधिकारी स. म., बाबूराव मुन्शी, प्राचार्या कमलाबाई पटवर्धन, रत्नाकर महाराज, भाऊसाहेब स्वामी, ब्रह्मचारिणी आदिती चैतन्या आदी नामवंत प्रवचनकारांनीही आपल्या वाणीने मठाची कीर्ती वाढवली. जानेवारी १९७० मध्ये सज्जनगडावरील समर्थ भक्तांनी समर्थ पादुकांचा प्रचारदौरा आयोजित केला. जबलपूरहून गोविंदबुवा आगाशे, सोबत श्री. देशपांडे (एलआयसी) व 'लोकवाणी'चे संपादक अ. र. पंडितराव भंडाऱ्यात आले. मठातील आरतीवेळी गोविंदबुवांनी अभिलेख दाखवून सांगितले, “हाच तो समर्थस्थापित मठ; आमचे ठिकाण सापडले!” आठ जानेवारी १९७० रोजी समर्थ पादुकांचे मठात आगमन झाले. करमरकरबुवा, आगाशेबुवा, मारुतीबुवा भोसले, डाफणे, गोडसे व अन्य बुवामंडळी सोबत होती. पाच दिवस मुक्कामात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी उसळे; कीर्तन-प्रवचनांनी वातावरण भारलेले असे. त्या दिवसांत भंडाऱ्यात जणू सज्जनगडच अवतरला होता. १४ जानेवारीला मंडळी नागपूरला ताराबाई बुटी मंदिर व धरमपेठेतील लक्ष्मीनारायण मंदिरात गेली; तेथेही समर्थभक्तांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
जानेवारी १९७०मध्ये दासनवमी उत्सवासाठी भिक्षेत जमलेले तांदूळ-गहू गडावर नेण्यासाठी परवाना आवश्यक होता. काही रामदासी भक्त कलेक्टर दैठणकर यांच्या भेटीला गेले. भक्तांना पाहताच साहेब आदराने उभे राहिले आणि भावुकतेने म्हणाले, “मी साताऱ्याच्या गडपायथ्याचा. आज समर्थांचे दर्शन आपल्या रूपाने झाले.” त्यांनी तत्काळ फूड ऑफिसर येवलेकर यांना बोलावून परवाना मंजूर करण्याचे आदेश दिले. समर्थकृपेने या मठाला कीर्तन, प्रवचन, भजन व संगीताचा समृद्ध वारसा लाभला आहे. श्रीरामनवमीचे कीर्तन आणि कार्तिकातील काकड आरती भक्तिमय वातावरणाने ओतप्रोत असतात. नित्य पूजा-उपासनेने नटलेली ही मठवास्तू खऱ्या अर्थाने श्रद्धा व भक्तीचे पवित्र स्थान आहे.
(मूळ माहितीस्रोत : श्री समर्थ रामदासी मठ माहितीपुस्तिका. पुनर्लेखन : ओमकार मिलिंदराव हरदास, भंडारा जिल्हा व्यवस्थापक, अमृत)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment