अध्यात्म, श्रद्धा आणि चमत्कार यांचा अनोखा संगम असलेले स्थळ
काही स्थळे ही फक्त प्रेक्षणीयच नसतात, तर तिथे श्रद्धा आणि भक्ती यांचा अनोखा संगम असतो. असेच एक ठिकाण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर.
महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले शनिशिंगणापूर मंदिर भक्तांसाठी एक अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. हे शनिदेवाचे मंदिर न्याय आणि कर्माचे प्रतीक मानले जाते. भारतातील इतर कोणत्याही मंदिरापेक्षा वेगळे असे हे मंदिर मोकळ्या जागेत आहे. तेथे मूर्तीसाठी गाभारा नाही आणि छतही नाही आहे! या गावाची आणखी एक आश्चर्यकारक परंपरा म्हणजे येथे घरांना दरवाजे नसतात. गावकऱ्यांचा दृढ विश्वास आहे, की शनिदेवाच्या कृपेने येथे चोरी होत नाही. त्यामुळे लोक निर्धास्तपणे राहतात. श्रद्धाळू येथे येऊन केवळ दर्शन घेत नाहीत, तर या परंपरेचा अनुभव घेतात. शनिवारच्या दिवशी आणि अमावास्येला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. दूरदूरवरून भक्त येथे येऊन तेलाचा अभिषेक करतात आणि शनिदेवाची कृपा मिळवतात. हे केवळ एक मंदिर नाही, तर विश्वास आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे.
शनिशिंगणापूर मंदिराचा उगम जितका रहस्यमय, तितकाच अद्भुत आहे. अशी आख्यायिका आहे, की अनेक शतकांपूर्वी, एका जोरदार पावसानंतर, गावकऱ्यांना पानस नाल्यात एक प्रचंड काळा दगड तरंगताना आढळला. कुतुहलाने एका गुराख्याने त्या दगडाला काठीने टोचले आणि आश्चर्य! त्या दगडातून रक्त वाहू लागले! त्याच रात्री शनिदेव त्या गुराख्याच्या स्वप्नात आले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले, की हा दगड त्यांचे दिव्य रूप आहे. त्यांनी आदेश दिला, की हा दगड गावात प्रतिष्ठापित करावा; पण एका अटीसह. त्याच्यावर कोणतेही छप्पर नसावे. गावकऱ्यांनी शनिदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि आजही हे मंदिर उघड्यावरच आहे, कोणत्याही गाभाऱ्याशिवाय.
येथे येणारे भाविक अभिषेक करतात. शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्या मूर्तीवर तेल अर्पण केले जाते. शनिवारी आणि अमावास्येला येथे विशेष गर्दी असते. असे मानले जाते, की या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. शनिदेवाच्या या मंदिरात दररोज पहाटे काळ्या पाषाणाच्या मूर्तीला विधीपूर्वक स्नान घालून पूजेला सुरुवात होते. त्यानंतर आरती आणि मंत्रोच्चार होतात. इथे येणारे भाविक शनिदेवाला तेल, काळे तीळ आणि फुले अर्पण करतात. शनिवारी विशेष पूजा होते.
इथे भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी आहे. या काळात हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे उष्णतेचा त्रास न होता भाविकांना मंदिर परिसर सहज पाहता येतो. सर्वांत जवळचा विमानतळ छत्रपती संभाजीनगरचा आहे. शिर्डी (७० किमी), अहिल्यानगर (३५ किमी), पुणे (१६० किमी) आणि मुंबई (३०० किमी) यांसारख्या मोठ्या शहरांमधून येथे जाण्यासाठी उत्तम रस्ते आहेत.
शनिशिंगणापूरपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असलेले शिर्डी हे श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे साईबाबा मंदिर, द्वारकामाई आणि चावडी ही प्रमुख तीर्थस्थळे आहेत. अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला हेही प्रेक्षणीय स्थळ आहे. या स्थळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील घरांना नसलेले दरवाजे!. स्थानिकांचे ठाम मत आहे, की चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तत्काळ दैवी शिक्षा होते. ही श्रद्धा आणि विश्वास गेल्या कित्येक शतकांपासून गावात शांती आणि सुरक्षिततेचे वातावरण टिकवून आहे. केवळ घरेच नव्हे, तर आधुनिक संस्थादेखील या परंपरेचे पालन करतात. विशेष म्हणजे, येथे बँकही कुलपाशिवाय कार्यरत आहे. हे गावकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. ज्यांना अध्यात्म, श्रद्धा आणि चमत्कार यांचा अनोखा संगम अनुभवायचा आहे, त्यांनी आयुष्यात एकदा तरी शनिशिंगणापूरला भेट दिलीच पाहिजे!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment