भंडाऱ्याचे पावन आणि पुरातन असे श्री भृशुंड गणेश मंदिर

धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र

भंडाऱ्याचे पावन आणि पुरातन असे श्री भृशुंड गणेश मंदिर मुख्य फोटो
भंडाऱ्याचे पावन आणि पुरातन असे श्री भृशुंड गणेश मंदिर अतिरिक्त फोटो

ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येषु सर्वदा।।

विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक व भंडारा जिल्ह्याची ग्रामदेवता म्हणून मान्यता असलेले श्री भृशुंड गणेश मंदिर हे भंडाऱ्यातील मेंढा नामक जुन्या वस्तीत स्थित आहे. मूळ स्वरूपातील हेमाडपंती पद्धतीचे दगडी बांधकाम व समोर ओटा असलेल्या या मंदिरात भव्य श्री गणेश मूर्तीसमोर शिवलिंग व भव्य, बैठी अशी नंदीची मूर्ती असे मूळ स्वरूप होते. गणेशपुराण, मुद्गलपुराणात उल्लेखित असे हे प्रसिद्ध व प्राचीन मंदिर आहे. 

लीळाचरित्रानुसार इ. स. ११३०मध्ये या गणेशमूर्तीची स्थापना झाली असा अंदाज आहे. कित्येक वर्षे हे मंदिर दुर्लक्षित होते. भंडारा येथील ग्रामजोशी कै. विश्वासराव जोशी यांच्या पुढाकाराने १९८६पासून श्री भृशुंड गणेशाची पूजा सुरू केली गेली. ती सेवा परंपरेने ग्रामजोशी कुटुंबीयांकडे आजपर्यंत चालत आलेली आहे. कालांतराने कौटुंबिक परिस्थितीत बदल होऊन अनेक जोशी कुटुंबीय भंडाऱ्याबाहेर स्थलांतरित झाले. विश्वासराव जोशी यांनी ग्रामदेवतेची सेवापूजा अखंड सुरू राहावी या उद्देशाने पुढाकार घेतला. त्यांनी मेंढा वस्तीसह भंडारेकर, श्रद्धावान भाविक आणि ग्रामस्थांना एकत्र करून १९९५ साली भृशुंड गणेश मंदिर सर्ववर्गीय व सार्वजनिक स्वरूपात रूपांतरित केले. पुढे लोकसहभागातून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आणि त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. 

मंदिरात शिवलिंग, नंदीची मूर्ती, तसेच इतर देवतांची विधिवत स्थापना करण्यात आली. पूर्वी एका लहान हेमाडपंती देवळापुरती मर्यादित असलेली ग्रामदेवता आज व्यापक श्रद्धेचे केंद्र बनली आहे. सध्या भाविक आणि उपक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दर वर्षी होणारे धार्मिक व सामाजिक उपक्रम, त्यांचा लेखाजोखा सादर होऊन मंदिराच्या इतिहासात नोंद व्हावी व परिसराला धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक एकोपा वाढून परंपरा, संस्कृती, सेवा भावना आणि सामाजिक जबाबदारी सातत्याने दृढ होत आहे.

'भ्रूमध्यात शुंडः इति भृशुंडः' असे गणेशपुराणात नामकरण केल्याप्रमाणे 'स्वरूप समाधी' रूपात असलेली ही एकमेव गणेशमूर्ती अखंड रक्ताश्म शिळेवर कोरलेली आहे. गाभाऱ्यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रुंद अशी ही मूर्ती असून संपूर्ण सिंदूरचर्चित, चतुर्भुज व मूषकारूढ आहे. डाव्या पायाची मांडी व उजवा पाय खाली सोडलेला असून हातात पाश, अंकुश, मोदक व वरद-हस्त स्वरूप आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. शेषफण्याखाली महर्षींचे जटाजूट, भालप्रदेश, नासिका, उन्मनी अवस्थेतील डोळे, मिश्या, दाढी असून, भव्य व स्पष्ट चेहरा दिसतो.

गणेशमूर्तीच्या मुखापासून निघालेली सोंड डाव्या हातातील मोदकाकडे वळलेली असून वस्त्र, मेखला, शिवाय मूषकाचे पाय, मुख व कान ही रचना स्पष्ट दिसते. मंदिर परिसरात गणेश, शिवलिंग व नंदी या तीन मुख्य मूर्ती असून शेजारी उग्र, उंच व छत नसलेली महावीर हनुमानाची मूर्ती आहे. ती भक्तांना पावते अशी श्रद्धा आहे. पूर्व दिशेला गिरीवंशीय शैव गोसावींच्या अतिशय रेखीव नक्षीकामयुक्त समाधी आहेत. गणेश व मुद्गल पुराणातील संदर्भ, शिल्पीय व भौगोलिक पुराव्यांवरून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदीकिनारी महर्षी भृशुंडांची तपोभूमी येथे असल्याचा तर्क मांडला जातो.

भारतीय संस्कृतीत गणेशपूजनाला आद्य स्थान आहे. गणेश ही विद्या व ज्ञानाची देवता असून, महाराष्ट्रातील संत-महंतांनी सदैव प्रथम गणेशवंदना केली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात पुढील गणेशस्तवनाने केली आहे. 

ॐ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ।।

देव देव गणेशु सकळार्थदाता ।

तूंचि ओंकारु मूर्ती तूं श्री गणेशा ।।

मंदिरात दर चतुर्थीला अभिषेक व महापूजा होते. गणेशोत्सव दहा दिवस साजरा केला जातो. तसेच पौष संकष्ट चतुर्थीपासून माघ चतुर्थीपर्यंत महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. ग्रामस्थ व महिला भक्त उत्साहाने सहभागी होऊन पूजा-उत्सव पार पाडतात. 

या देवस्थानाला आजवर अनेक संत महंतांनी भेटी दिल्या आहेत. त्यात शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होते. अलीकडेच बडोद्याचे प. पू. श्री जनार्दनस्वामी खेर यांनीसुद्धा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले. 

कै. विश्वासराव जोशी यांच्या प्रयत्नांतून मंदिराचा विकास, सार्वजनिक गणेशोत्सव व सामाजिक एकात्मतेची परंपरा दृढ झाली. अनेक तज्ज्ञांच्या संशोधनामुळे या इतिहासाला आधार मिळाला आहे. अशा या पावन भृशुंड गणेश मंदिराला पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजेच पौष संकष्ट चतुर्थीला अमृत संस्थेतर्फे दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली. 

अमृत संस्थेच्या कार्यासाठी कृपादृष्टी व्हावी, स्वयंरोजगार व उन्नत कौशल्य भारत योजनांद्वारे लाभार्थ्यांच्या जीवनात आत्मनिर्भरता, आत्मसन्मान व प्रगती नांदावी, प्रत्येक लाभार्थ्यास संधी, कौशल्यवृद्धी व उद्योगात यश लाभो, तसेच ज्ञान, सद्बुद्धी व प्रामाणिकपणाने त्यांचे जीवन समृद्ध व्हावे, संस्थेचे कार्य निःस्वार्थ व पारदर्शक राहून सर्व स्तरांवर विकास, रोजगार व स्वावलंबनाची नवी दिशा मिळावी, अशी प्रार्थना श्री भृशुंड गणेशाचे चरणी करण्यात आली. 

Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 04:40 PM News publication time | Views: 295 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 04:40 PM News publication time | Views: 295 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words