हिंदवी स्वराज्याची राजधानी : रायगड किल्ला

रायगड म्हणजे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला. या रायगडाची माहिती सांगणारा हा लेख....

हिंदवी स्वराज्याची राजधानी : रायगड किल्ला मुख्य फोटो
मुख्य फोटो

रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात महाडच्या उत्तरेस २५ किलोमीटरवर व जंजिऱ्याच्या पूर्वेस ६५ किलोमीटरवर सह्याद्री पर्वतश्रेणींत ५.१२५ चौरस किलोमीटर घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ८४६ मीटर असून, सभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या टेकडीचे जुने नाव. पाश्चात्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी उभी राहिली. हे जाणूनच शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली.

रायगडचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. रायगडाविषयी अनेक कथा, दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. छत्रपती शिवाजी-संभाजी यांच्या कारकीर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगीज इत्यादी वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यांत फ्रायर, हेन्री ऑक्सिंडेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स आदींचे वृत्तान्त इतिहासावर प्रकाश टाकतात. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पतकरले. इ. स. १४३६मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमनीशाहने तो आपल्या ताब्यात घेतला. इ. स. १७४९मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१). पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसते. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर आदिलशहाशी झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली (१६३६). आदिलशाहने १६३६ ते १६४४ दरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्यातील इब्राहीम, सय्यद कब्बरी व शेख अली यांना हवालदारीचे हक्क दिले. नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाहीतर्फे गेली. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोऱ्यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी १५ एप्रिल ते १४ मे १६५६ दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. शिवाजींनी रायरीचे ‘रायगड’ असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यांना रायगडाच्या नूतनीकरणाचे काम दिले. 

शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली. १६७४मध्ये येथेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर १६८९पर्यंत तो छत्रपती संभाजींच्या ताब्यात होता. पुढे तो मुघलांनी घेतला (१६८९) आणि नंतर पुन्हा मराठ्यांनी घेतला (१७३५); परंतु त्याचे वैभव नष्ट झाले. उत्तर पेशवाईत रायगड हे राजकीय कैद्यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते. नाना फडणवीसांनी १७९६मध्ये काही इमारतींची डागडुजी केली. मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने १० मे १८१८ रोजी रायगड जिंकून घेतला. त्या वेळच्या तोफांच्या माऱ्यात अनेक इमारती पडल्या. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त १८९७मध्ये लो. टिळक प्रभृतींनी लोकजागृतीसाठी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला. आता ते पर्यटकांचे एक प्रेक्षणीय स्थान झाले आहे.

नगारखाना, मनोरे, बुरुज, मंदिरे इत्यादी काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून, त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. किल्ल्यास हिरकणी, टकमक, भवानी आणि श्रीगोंदे अशी चार टोके असून टकमक टोक व हिरकणी यांबद्दल रोमांचकारी दंतकथा प्रसिद्ध आहेत. नगारखाने, दरवाजे, पाण्याचे कुंड अशी अनेक स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे या किल्ल्यावर आहेत. 

आपला प्राचीन इतिहास अशा गड-किल्ल्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो.आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वराज्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न केले असतील, जीवाची बाजी लावली असेल, हे या गडांच्या माध्यमातून लक्षात येते. या फक्त दगडांच्या इमारती नाहीत तर तो पुरावा आहे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, त्यांच्या बलिदानाचा आणि आपल्या आजच्या स्वतंत्र अस्तित्वाचा. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement