मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. हेडगेवार गोशाळेत उमलणार 'देववृक्ष' .'अनुलोम' व 'अमृत'चा संयुक्त उपक्रम.
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी गोशाळेत 'देववृक्ष' लागवड; 'अनुलोम' व 'अमृत'चा संयुक्त उपक्रम. सिल्लोड: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार गोशाळेत भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. 'अनुगामी लोकराज्य महाअभियान' (अनुलोम) आणि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गोशाळेच्या परिसरात अत्यंत पवित्र मानले जाणारे 'देववृक्ष' तसेच इतर विविध प्रकारच्या औषधी व सावली देणाऱ्या अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या प्रसंगी 'अनुलोम'चे जनभाग सेवक जगदीश कळवत्रे, 'अमृत'चे व्यवस्थापक अक्षय लंबे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, गोशाळेचे अध्यक्ष अंबादास लोखंडे, सचिव सचिन लोखंडे आणि संजय दौड प्रामुख्याने उपस्थित होते. वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, केवळ वृक्षलागवड करून न थांबता या झाडांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. या कार्यक्रमाला 'अनुलोम'चे मित्र रामेश्वर गव्हाणे यांच्यासह पिंपळदरी गावातील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------------------------------------------- योगेश रोडे, जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत, छत्रपती संभाजीनगर. "मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार गोशाळेत 'अनुलोम' व 'अमृत' यांच्या संयुक्त विद्यमाने देववृक्षांसह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वृक्ष हीच भावी पिढीची खरी संपत्ती आहे. अधिकाधिक वृक्ष लावून त्यांचे जतन करूया आणि हरित, समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया."
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment