बोधकथा- क्र.- ५५
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती | वेद म्हैशा मुखी वदविले |
कोठवरी वानू याची स्वरूपस्थिती | चालविली भिंती मृत्तिकेची ||
चांगदेव महाराज हे ज्ञानेश्वरांच्या काळातील फार मोठे योगी होते. त्यांना तपामुळे काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना अहंकार झाला. त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती सुद्धा सर्वदूर पसरली होती. आपले गुरु चांगदेव हे ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, असे चांगदेवांच्या शिष्यगणांना वाटत होते. चांगदेवांनाही एकदा आपल्या सामर्थ्याची चुणूक ज्ञानेश्वरांना दाखवायची होतीच. चांगदेव वाघावर आरूढ झाले आणि हातात सापाचा चाबूक घेऊन ते ज्ञानेश्वरांच्या भेटीला निघाले. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे आळंदीतील एका भिंतीवर बसलेली होती. चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत, हे पाहताच ज्ञानदेव त्या भिंतीला म्हणाले, “हे माय, एवढा मोठा योगी येतो आहे, त्याला सामोरे जायला हवे, तू आम्हाला नेतेस का?” असे ज्ञानदेव म्हणताच भिंत चालू लागली. ते दृश्य पाहून चांगदेव थक्क झाले. आपले तपोबल दाखविण्यासाठी चांगदेव वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यावर आरूढ झाले होते. परंतु ज्ञानदेवांच्या तपोबलाने तर निर्जीव भिंतही चालू लागली. चांगदेवांचा अहंकार निघून गेला. ते ज्ञानेश्वरांसमोर नतमस्तक झाले.
अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. जगात या वृथा अहंकारापायी अनेक संघर्ष झाले, अनेक संस्कृती लयास गेल्या. तेव्हा आपण या अहंकारापासून दूर राहूया. विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊया!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment