सिद्धेश्वर तलावाच्या काठी असलेली वारसा वास्तू
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याला मोठा राजकीय इतिहास लाभला आहे. मुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या कालावधीत सुमारे वर्षभर या किल्ल्यात राहिला होता. विशेष म्हणजे, त्याच्या काळातील चांदीची नाणी याच किल्ल्यातील टाकसाळीतून तयार झाली होती. त्याचे अवशेष आजही कोलकाता येथील संग्रहालयात जतन केलेले आहेत. पुढे १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि दुसरे बाजीराव पेशवे यांचे येथे वास्तव्य होते. शेवटी, मे १८१८मध्ये इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीराव पेशव्यांचा पाडाव केला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
सोलापूरचा हा भुईकोट किल्ला केवळ एक वास्तू नसून, शहराचा जिवंत इतिहास आहे. प्रशासनाने पाच रुपयांच्या तिकिटासोबतच येथील बागेची काळजी घ्यावी, कारंजी सुरू करावीत आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
बाराव्या शतकात बांधलेला हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी व हौशी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला आहे. सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले १८१८मध्ये एक महिना येथे राहिले होते. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती वजीर महमूद गावान यांनी दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हे बहमनी सुलतान मोहम्मद शाह यांचे दिवाण होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment