सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पुरातन उत्तरेश्वर महादेव मंदिर

इतिहास, अध्यात्म अन् देशप्रेमाचा त्रिवेणी संगम

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पुरातन उत्तरेश्वर महादेव मंदिर मुख्य फोटो
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पुरातन उत्तरेश्वर महादेव मंदिर अतिरिक्त फोटो

शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराला एक समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. बार्शी हे नाव बारा ज्योतिर्लिंगांवरून पडल्याचे म्हटले जाते. याच द्वादशी क्षेत्रात असलेले उत्तरेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक प्रार्थनास्थळ नसून, त्रेतायुगातील आख्यायिका, संतपरंपरा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील कथेचे एक जिवंत केंद्र आहे. त्याला स्थानिक भाविक मोठा महादेव म्हणूनही ओळखतात. 

संत नामदेव आणि संत विसोबा खेचर यांच्या भेटीचे साक्षीदार

​या मंदिराला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याशिवाय विठ्ठलाचा मोठा भक्त कोणी नाही, असा गर्व संत नामदेवांना झाला होता. त्या गर्वाचे हरण करण्यासाठी त्यांना येथे पाठवले होते. याच मंदिरात नामदेवांची गाठ त्यांचे गुरू संत विसोबा खेचर यांच्याशी पडली. विसोबांनी पिंडीवर पाय ठेवून झोपण्याचे अचंबित करणारे कृत्य करून नामदेवांना चराचरात शिव सामावला असल्याचा दिव्य गुरुमंत्र दिला. विसोबा खेचर यांची समाधीही मंदिराच्या उत्तर दिशेला असून, श्रावण शुक्ल एकादशीला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

दुर्वास ऋषींची कथा अन् चक्रतीर्थाची निर्मिती

​पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी ही विष्णुभक्त अंबरीश राजाची नगरी होती. राजाचा साधनद्वादशी व्रत भंग करण्यासाठी इंद्राच्या सांगण्यावरून दुर्वास ऋषी येथे आले होते; मात्र गैरसमजातून झालेल्या क्रोधानंतर राजाच्या रक्षणासाठी स्वतः भगवान विष्णू सुदर्शन चक्रासह प्रकट झाले. ​विष्णूंच्या सुदर्शन चक्रापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुर्वास ऋषींनी महादेवाची स्थापना करून त्यांची आराधना केली. दुर्वासांनी स्थापन केलेली तीच शिवपिंडी आज उत्तरेश्वर म्हणून पूजली जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेले चक्रतीर्थ (कुंड) हे याच सुदर्शन चक्रामुळे निर्माण झाल्याचे मानले जाते. या कुंडाचे मूळ सभामंडपातील कासवाच्या मूर्तीखाली असून, १९८३च्या भीषण दुष्काळात हे मूळ चक्रकुंड पाहता आले होते, असे जुन्याजाणत्या व्यक्ती सांगतात.

​ऐतिहासिक महत्त्व : याच मंदिराच्या बाहेरील चक्रतीर्थ कुंडात १९४८मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थिरक्षेचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे या मंदिराला एक ऐतिहासिक परिमाण लाभले आहे.

Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode,Arya kulkarni News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:50 AM News publication time | Views: 231 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode,Arya kulkarni News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:50 AM News publication time | Views: 231 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement