खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वावलंबनासाठी अमृत संस्था करतेय प्रभावी कार्य
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. राज्यातील बेरोजगारी कमी करून युवकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक तरुण उद्योजक आर्थिक साह्याच्या बळावर स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अमृत संस्थेच्या माध्यमातून युवकांना आधुनिक कौशल्यप्रशिक्षणासोबतच व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि बाजारपेठेची माहिती दिली जात आहे. तसेच उद्योजकांसाठी बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जात आहे. बेकरी, सौरऊर्जा तंत्रज्ञान, शिवणकला, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, ड्रोन प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगारक्षम बनवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता, प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साह्य दिले जात आहे आणि सतत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे अनेक युवकांनी लघुउद्योग सुरू करून स्वतःसह इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
ग्रामीण भागातील युवक व महिलांचा या योजनांमध्ये वाढता सहभाग ही या उपक्रमाची विशेष बाब ठरत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचत असल्याने सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला गती मिळत आहे. अमृत संस्थेचे उपक्रम‘रोजगार निर्माण करणारे’ उद्योजक घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण काम करत आहेत. शासनाच्या या पुढाकारामुळे राज्यातील उद्योजकतेला नवे बळ मिळत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment