प्रेरणादायी लोकबिरादरी प्रकल्प

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी नुकतीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची भेट घेऊन चौधरी यांनी त्यांना अमृत संस्थेच्या कार्याविषयी आणि योजनांविषयी माहिती दिली. चौधरी यांनी लिहिलेला लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे. हा प्रकल्प माडिया गोंड आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी २३ डिसेंबर १९७३ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी सुरू केला. त्यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी त्या प्रकल्पाचे काम हाती घेतले. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी कोइनगुडा आणि हेमलकसा गावांमध्ये तंबू ठोकून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला दोन गवताच्या झोपड्या होत्या. त्यांना दारे नव्हती आणि तेथे वीजही नव्हती. १९९५मध्ये तेथे वीज आणि १९९९मध्ये टेलिफोन आले. मुख्य सुविधा प्रकल्पात ४० खाटांचा दवाखाना आहे. त्यातून दर वर्षी १५०० गावांतील ४० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय शाळा, मुलांसाठी वसतिगृह, अनाथ प्राण्यांसाठी प्राणिसेवा केंद्र आणि खेळाचे मैदान प्रकल्पात आहे. हा प्रकल्प एकूण १७ हेक्टर जमिनीवर पसरलेला आहे.
डॉ. आमटे दाम्पत्य गावकऱ्यांसोबत राहून संवादाद्वारे हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देतात. दुर्गम भागातील मूलभूत गरजा पूर्ण करते. त्यांची कार्यपद्धती आदिवासींच्या एकात्मिक विकासावर आधारित आहे. त्यात वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि प्राण्यांच्या संरक्षणासह सामाजिक जागृती यांचा समावेश होतो. हे दाम्पत्य १९७३पासून हेमलकसा येथे वीज नसतानाही शस्त्रक्रियांसह वैद्यकीय सेवा-सुविधा पुरवते. आज ४० खाटांचा दवाखाना दर वर्षी ४० हजार आदिवासींना सेवा देतो. भाषा, भूप्रदेश आणि भीती यांसारख्या अडचणींवर मात करून अंधश्रद्धा दूर करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. गाव विकास कार्यक्रमांतर्गत तलाव खणणे, पाणी संरक्षण आणि झाडे लावणे यांसारखे उपक्रम राबवले जातात.
लोकबिरादरी प्रकल्प आश्रमशाळेत ६०० विद्यार्थी शिकतात. त्यात आदिवासींच्या हक्कांची जाणीव आणि शेती, डेअरी, बांबू शिल्प निर्मिती यांसारखे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी आदिवासींच्या वास्तवाशी जुळणारे शिक्षण देणे ही त्यांची पद्धत आहे. अनाथ आणि जखमी प्राण्यांसाठी वन्यप्राणी अनाथाश्रम तेथे चालवला जातो. तिथे दुर्मीळ प्राणी स्वतंत्रपणे वावरतात. आमटे दाम्पत्याच्या मुलांसह कुटुंबाने हा उपक्रम पुढे चालवला आहे.

डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला २००८चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

कसे जायचे?
हेमलकसा हे ठिकाण गडचिरोली मुख्यालयापासून १६० किलोमीटर आणि आल्लापल्लीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. येथून नागपूर विमानतळ ३५० किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने यायचे झाल्यास बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर यावे लागते. तिथून एसटी/खासगी वाहने उपलब्ध आहेत.

Publisher: Vijay Chaudhari News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 209 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news
Publisher: Vijay Chaudhari News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 209 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words