अमृतसखी शिबिरातून मिळाला नवा दृष्टिकोन आणि सकारात्मक ऊर्जा

नुकत्याच झालेल्या शिबिराबद्दल व्यक्त झालेली प्रातिनिधिक भावना...

अमृतसखी शिबिरातून मिळाला नवा दृष्टिकोन आणि सकारात्मक ऊर्जा मुख्य फोटो
अमृतसखी शिबिरातून मिळाला नवा दृष्टिकोन आणि सकारात्मक ऊर्जा अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमध्ये ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक म्हणून मी, माया रत्नपारखी-खेत्रे, कार्यरत आहे. १८ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अमृतसखी शिबिराला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सर्वांनी केवळ कार्यालयीन उद्देशाने एकत्र जमणे एवढ्यापुरताच या शिबिराचा हेतू मर्यादित नव्हता. एक प्रकारे, अमृत संस्थेत कार्यरत असलेल्या स्त्री-शक्तीचे हे स्नेहसंमेलन होते. या शिबिरात उपस्थित असलेल्या माझ्यासह प्रत्येकीला या शिबिराने एक नवा दृष्टिकोन आणि अधिक जोमाने काम करण्याकरिता नवा आत्मविश्वास प्राप्त करून दिला. राज्याच्या सर्व विभागांतील अमृतसखी या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.

१८ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता सुमेधाताई देशपांडे यांनी प्रत्येकीची ओळख करून घेतली. त्या वेळी विशेष कार्य अधिकारी श्रीराम बेंडे आणि विशेष कार्य अधिकारी प्रवीण पांडे हेदेखील उपस्थित होते. मान्यवरांच्या प्रेरक भाषणांमुळे या शिबिराविषयीचे कुतूहल अधिक जागृत झाले. १९ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कोणतेही काम करताना ते आपण का करतो आहोत याची दिशा/विचार डोक्यात निश्चित असेल, तर ते काम योग्य रीतीने होण्यास मदत होते. या संदर्भात जोशी सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नेमके काय केले पाहिजे, त्यासाठी काय करायचे या संदर्भात त्यांनी आम्हा सर्वांना समूहचर्चा करायला सांगितली. त्यामुळे आमच्या विचारांना चालना मिळाली. त्यानंतर अमृत महाराष्ट्र या विषयावर कौमुदी परांजपे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी अमृतवर्गाने दिवसाचा समारोप झाला.

२० फेब्रुवारी रोजी सकाळी सविता जगताप, प्रज्ञा रोडे यांनी अमृतपेठ आणि अमृतवर्गाबद्दल माहिती दिली. कार्यालयीन कामाचे सादरीकरणही त्यांनी केले. त्यातून आमच्या दैनंदिन कामासंदर्भात खूप उपयुक्त माहिती मिळाली. संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी आणि कुलकर्णी सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंतही या वेळी उपस्थित होते. २१ फेब्रुवारीचा दिवस होता समारोपाचा... या दिवशी कार्यालयीन कामातील अडीअडचणींबद्दल सर्वांनी एकमेकींशी सविस्तर चर्चा केली. त्या सोडवण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाय चर्चेतून हाती लागले. नंतर निरोप समारंभ होऊन या शिबिराची सांगता झाली.

सुमेधाताई देशपांडे यांनी या शिबिराचे उत्तम नियोजन केले होते. तसेच, तन्मय वाळके यांच्यासह सर्वच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळाले. निवास आणि भोजनव्यवस्थाही अत्यंत चांगली होती. यामध्ये ज्ञान तर मिळालेच, पण कार्यपद्धतीबद्दल नवीन दृष्टिकोन, कौशल्य आणि आत्मविश्वासही मिळाला. सकारात्मक ऊर्जेने भारलेले वातावरण अनुभवता आले. मला संस्थेकडून कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात आला. नियोजनबद्ध पद्धतीने आणि अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही संस्थेत काम करताना ते प्रभावीपणे होण्यासाठी सर्वांमध्ये एक स्नेहबंध असणे अत्यंत आवश्यक असते. ते स्नेहबंध विकसित होण्यासाठी या शिबिराने मोठा हातभार लावला. सहभागी असलेल्या सर्वच जणी याच्याशी नक्की सहमत होतील. अमृत हा एक परिवार असल्याने कोणाचे आभार मानणे सयुक्तिक ठरणार नाही; पण या सुंदर अनुभवासाठी मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते!

- माया रत्नपारखी-खेत्रे

ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

Publisher: Maya Ratnaparkhi-Khetre News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 383 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news
Publisher: Maya Ratnaparkhi-Khetre News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 383 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

P
Prajkata v pathakaji
24-02-2026 09:32 PM

हो, खूप चांगला अनुभव आला या अमृत सखी शिबीर मधून काम करण्यास आणखी प्रोसाहन मिळाले, अमृत संस्था आणि सर्व वरिष्ठ सर यांना
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

R
Rashmi chaubal
24-02-2026 04:03 PM

खूप छान लेखन. थोडक्यात कार्यक्रमांचा आढावा. मौलिक मार्गदर्शनाची टिप्पणी व्यवस्थापन.
सुंदर रित्या मांडली 👌👍

Write a Comment
0 / 50 words