कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर

थक्क करणारी स्थापत्यशैली आणि पारंपरिक वारसा

कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूरच्या हृदयस्थानी उभे असलेले महालक्ष्मी मंदिर म्हणजे भक्ती, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम आहे. अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी ही देवी वैभव आणि संपत्तीची अधिष्ठात्री आहे. संपूर्ण भारतातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. शक्तिपीठांपैकी एक असल्याने या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या प्राचीन मंदिराची स्थापत्यशैली थक्क करणारी आहे. चालुक्य राजवटीच्या उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना येथे पाहायला मिळतो. मंदिराच्या भिंतींवरील कोरीव काम, भव्य खांब आणि सुबक मूर्ती उत्तम स्थापत्यकलेची साक्ष देतात. गाभाऱ्यात विराजमान असलेली महालक्ष्मी देवीची मूर्ती अलौकिक आहे. स्वयंभू असणारी ही मूर्ती भक्तांच्या श्रद्धास्थानी विराजमान आहे. सातव्या शतकात चालुक्य सम्राटांनी उभारलेले महालक्ष्मी मंदिर ही केवळ वास्तू नसून, श्रद्धा आणि भव्य स्थापत्यकलेचे अमर प्रतीक आहे. शतकानुशतके या मंदिराने अनेक राजवटींची उलथापालथ पाहिली आहे. प्रत्येक राजवटीने या पवित्र स्थळी आपला ठसा उमटवला. यादव राजांनी मंदिराचा विस्तार करत त्याचे महत्त्व अधिक वाढवले आणि ते एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले. हे मंदिर केवळ स्थापत्यदृष्ट्या नव्हे, तर ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. 

प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. महालक्ष्मी देवीच्या असीम शक्तीच्या अनेक कथा श्रद्धेने सांगितल्या जातात. देवीचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी शेकडो वर्षांपासून लाखो भक्त येथे येतात. महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे अद्भुत उदाहरण आहे. या भव्य मंदिराच्या रचनेत सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता दगडांची अनोखी जुळवाजुळव करण्यात आली आहे. नाजूक नक्षीकाम आणि पुरातन शिल्पकला यांचा अप्रतिम संगम येथे पाहायला मिळतो. गर्भगृहात तीन फूट उंच काळ्या दगडातील महालक्ष्मी देवीची भव्य मूर्ती विराजमान आहे. देवीच्या मस्तकावर चमचमणारा रत्नजडित मुकुट असून, त्यावर पाचमुखी नागाची कोरलेली प्रतिमा आहे. तिच्या हातात मतुलिंग फळ, गदा, ढाल आणि पानपात्र आहे. ही आयुधे देवीच्या शक्ती, संरक्षण आणि कृपेचे प्रतीक मानली जातात. मूर्तीच्या मागे उभा असलेला सिंह देवीच्या सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. 

महालक्ष्मी मंदिराचा सर्वांत विस्मयकारक आणि अद्वितीय सोहळा म्हणजे किरणोत्सव. हा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी आणि ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सूर्यकिरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. हे दृश्य म्हणजे केवळ स्थापत्यकलेचा चमत्कार नाही, तर भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती आहे. त्या वेळच्या स्थापत्यकारांना वंदन करावेसे वाटते. कारण शेकडो वर्षांनंतरही सूर्य आणि पृथ्वी यांच्या बदलत्या स्थानाचे भान ठेवून त्यांनी मंदिराची अशाप्र कारे योजना केली आहे, की अजूनही सूर्यकिरणे एवढे सगळे अडथळे पार करत बरोबर मूर्तीवर पडतात. 

नवरात्र हा येथील सर्वांत मोठा सोहळा असतो. नऊ दिवस देवीच्या भक्तीत मंदिर न्हाऊन निघते. संगीत, नृत्य, भजन, आणि भव्य मिरवणुकींनी संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. महालक्ष्मी मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. त्यामुळे वर्षभरात कधीही तुम्ही मंदिरास भेट देऊ शकता. कोल्हापूर विमानतळ शहरापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, बेंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांशी हा विमानतळ थेट जोडलेला आहे. रेल्वेने येणाऱ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. हे स्थानक देशभरातील अनेक शहरांशी जोडलेले आहे. मंदिर येथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूरला रस्ते मार्गानेसुद्धा तुम्ही सहज पोहोचू शकता. मंदिराच्या अवतीभवती अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तेव्हा उत्कृष्ट स्थापत्य, पारंपरिक वारसा आणि आई अंबाबाईसमोर नतमस्तक होण्यासाठी आवर्जून भेट द्यावी असे हे स्थळ आहे.

(संदर्भ - maharashtratourism.gov.in)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement