पद्मश्री अंके गौडांचे २० लाख पुस्तकांचे मोफत ग्रंथालय

सर्वांसाठी ज्ञानाचे केंद्र उभारणाऱ्या अवलियाची गोष्ट

पद्मश्री अंके गौडांचे २० लाख पुस्तकांचे मोफत ग्रंथालय मुख्य फोटो
पद्मश्री अंके गौडांचे २० लाख पुस्तकांचे मोफत ग्रंथालय अतिरिक्त फोटो

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील हरलहल्ली या छोट्याशा गावात राहणाऱ्या अंके गौडा यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरवले. त्यांनी आपल्या भगीरथ प्रयत्नांनी एका साध्या गावाला ज्ञानाचे केंद्र बनवले. त्यांनी पुस्तकांची एक भव्य लायब्ररी तयार केली आहे. 

अंके गौडा यांचे लहानपण शाळा आणि वडिलांसोबत शेतात काम करण्यात गेले. लहानपणी ते पुस्तके खरेदी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे, तसेच मोठ्या बहिणीकडे पैसे मागायचे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि संतांवर लिहिलेली पुस्तके ते लहानपणी वाचत असत. त्यातूनच त्यांना पुस्तके वाचायची गोडी लागली. त्यांची ही आवड वाढतच गेली. इतकी, की त्याचे व्यसन लागले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मग ते पुस्तकांच्या दुनियेत हरवले. 

ते सांगतात, 'ही पुस्तके माझ्यासाठी चॉकलेट्ससारखीच होती.' एका शिक्षकाकडून प्रेरणा घेऊन त्यांनी पुस्तकांचा छोटासा संग्रह करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील इतर मुलेही ही पुस्तके वाचू शकतील, असा त्यांचा उद्देश होता. त्यांचे आई-वडील त्यांना खाऊसाठी जे पैसे द्यायचे, त्या पैशांतून ते नेहमी पुस्तके खरेदी करायचे. तरुण वयात सुरुवातीला त्यांनी बस कंडक्टर म्हणून नोकरी केली; पण पुढे पुस्तकांवरील त्यांचे प्रेम इतके वाढले, की हे प्रेमच त्यांचे जीवनध्येय झाले. 

त्यांनी कन्नड साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि नोकरी करत असताना उत्पन्नाचा मोठा भाग पुस्तकांमध्ये गुंतवला. पुस्तकांसाठी त्यांचे समर्पण इतके होते, की त्यांनी म्हैसूर येथील आपली खासगी मालमत्ता विकूनही ग्रंथसंग्रह वाढवला. पत्नी विजयलक्ष्मी आणि मुलगा सागर यांच्या सहकार्याने हरलहल्लीत त्यांनी २० लाख पुस्तकांचे विशाल मोफत ग्रंथालय उभे केले. गौडा यांची ही लायब्ररी कर्नाटक राज्याच्या मंड्या जिल्ह्यातील पांडवपुरा नावाच्या एका छोट्याशा शहरात आहे. या लायब्ररीमध्ये कुणीही ग्रंथपाल नाहीये. त्यांची ही पुस्तके कपाटात ठेवलेली आहेत. त्यातील बरीचशी जमिनीवरच एकावर एक रचून ठेवली आहेत तर काही अशीच इकडेतिकडे विखुरलेली आहेत. बाहेर, ग्रंथालयाच्या ताडपत्रीखाली, सुमारे आठ लाख पुस्तके पोत्यांमध्ये भरलेली आहेत. ही पुस्तकेही वाचकांची वाट पाहत आहेत. गौडा यांचा हा पुस्तकांचा संग्रह उत्तरोत्तर वाढतच चालला आहे. यातली काही पुस्तके गौडा यांनी स्वत: खरेदी केली आहेत, तर काही त्यांना दान स्वरूपात मिळाली आहेत. 

त्यांनी ज्या आवारात ही पुस्तके ठेवली आहेत, तिथे विद्यार्थी, त्यांचे आई-वडील, शिक्षक आणि वाचनप्रिय लोकांची नेहमीच वर्दळ असते. जे नियमितपणे या लायब्ररीत येतात, ते आता सहजतेने पुस्तकांमधून वाट काढून तिथे वावरतात आणि हवे ते पुस्तक शोधतात. त्यातही समजा एखादे हवे असलेले पुस्तक मिळाले नाहीच, तर हे वाचक म्हणतात, की गौडा या इतक्या पुस्तकांमधून हवे ते कोणतेही पुस्तक शोधून देऊ शकतात.

या ग्रंथालयात दुर्मीळ विदेशी पुस्तके, विविध भाषांचे शब्दकोश आणि संशोधन साहित्य उपलब्ध आहे. आज हे ग्रंथालय केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर संशोधक, लेखक आणि उच्च पदांवर कार्यरत व्यक्तींसाठीही ज्ञानाचे विश्वासार्ह केंद्र बनले आहे. इतकेच नाही, तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही संदर्भासाठी येथे भेट देतात. सर्वांत खास गोष्ट म्हणजे इथे वाचनासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

अंके गौडा म्हणतात, की शिक्षण आणि ज्ञानावर कोणाचाही अधिकार नसावा. निःस्वार्थ सेवा आणि अनमोल समर्पणातून त्यांनी दाखवून दिले आहे, की एक व्यक्तीही समाजात बदल घडवू शकते आणि हाच विचार त्यांना पद्मश्री सन्मानापर्यंत घेऊन गेला.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words