आतापर्यंत मिळाला ४८ हजार रुपयांचा व्याजपरतावा
धाराशिव : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. व्यवसायवृद्धीसाठीच्या योजनांमधून अनेक लाभार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, व्याजपरतावा योजना ही त्यातील एक महत्त्वाची योजना आहे. कळंब (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील मिलिंद मधुकर शेटे यांना त्या योजनेचा लाभ मिळाला आहे.
मिलिंद शेटे हे अतिशय मेहनती व प्रामाणिक तरुण व्यावसायिक असून, त्यांच्याकडे विविध उत्पादनांच्या एजन्सी आहेत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अमृत संस्थेच्या योजनांविषयी माहिती घेतली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी अमृत संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती भरली आणि रीतसर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभाचे 'लेटर ऑफ इंटेंट' मिळाले.
व्यवसायवाढीसाठी मिलिंद शेटे यांनी 'बँक ऑफ महाराष्ट्र'मधून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर हप्ते भरून नियमितपणे कर्जफेड करत आहेत. अमृत संस्थेमार्फत आतापर्यंत त्यांना व्याजपरतावा स्वरूपात एकूण ४८ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा लाभ मिळाला असून, हा लाभ त्यांच्या व्यवसायासाठी मोठा आधार ठरत आहे. त्यांच्या प्रामाणिक व नियोजनबद्ध वाटचालीमागे अमृत संस्था ठामपणे उभी आहे. मिलिंद शेटे यांच्या या मेहनतीला व पुढील व्यवसायवृद्धीसाठी अमृत संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी रीतसर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, मिलिंद शेटे यांच्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील अनेक लाभार्थी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन योग्य पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65469 पत्ता : अमृत संस्थेचे धाराशिव जिल्हा कार्यालय,
ऋणानुबंध, तळमजला, वृंदावन कॉलनी,
जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment