युवकांना मिळणार रोजगार आणि सौर ऊर्जावापरात होणार वाढ
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अमृत सूर्यमित्र कार्यक्रमाचा समारोप झाला. सौर ऊर्जा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची निर्मिती संस्थेने यातून केली असून, कौशल्यप्राप्तीमुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे किंवा स्वयंरोजगार करता येणार आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
दिवसेंदिवस ऊर्जेची वाढती गरज पाहता सौर ऊर्जेच्या वापराला पर्याय नाही. पीएम सूर्यघर योजनेमुळे सौर ऊर्जेचा वापर वाढला आहे; मात्र या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची उपलब्धता त्या तुलनेत कमी आहे. या पार्श्वभूमीवर, अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आपल्या लक्ष्यित घटकांसाठी सूर्यमित्र हा निःशुल्क, पण दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबवला असून, रोजगारनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार असे उद्देश त्यामागे आहेत.
सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने सक्षम करणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या प्रशिक्षणामध्ये सोलर पॅनेल उभारणी, सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन, वायरिंग, देखभाल व दुरुस्ती, सुरक्षितता उपाययोजना, तसेच सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित सखोल तांत्रिक माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्याने प्रशिक्षणार्थ्यांना सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
समारोप कार्यक्रमाला अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे उपस्थित होते. विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी अमृत कार्यालयातील अधिकारी, 'एमसीईडी'चे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, सौ. करुणा शेंडे, तसेच बॅच आयोजक सौ. ज्योती धिरडे यांचीही उपस्थिती होती.
प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणातून रोजगाराभिमुख व उपयुक्त कौशल्ये मिळाल्याचे मत व्यक्त करून अमृत संस्था आणि 'एमसीईडी'चे आभार मानले. सर्व लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करणार असल्याचा मानस व्यक्त केला. सूर्यमित्र प्रशिक्षण उपक्रमामुळे युवकांना सौर ऊर्जा क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवण्याची नवी दिशा मिळाली असून, अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment