अभिनय आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा कलाकार
'एक धागा सुखाचा' हे अजरामर गाणे लागले की आठवतो सुधीर फडके यांचा जादुई आवाज, ग. दि. माडगूळकर यांचे काळजाला भिडणारे शब्द आणि त्या हातमागावर काम करताना ते गाणे म्हणताना दिसणारे राजा परांजपे. काय विलक्षण गाणे आहे हे! आणि तेवढाच विलक्षण अभिनय केला होता राजा परांजपे यांनी. नऊ फेब्रुवारी हा राजाभाऊंचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने जाणून घेऊ या या थोर कलाकाराबद्दल...
राजाभाऊ दत्तात्रय परांजपे ऊर्फ राजा परांजपे हे मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगातील एक भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक होते. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो संगीत विभागात ऑर्गनवादक म्हणून! राजाभाऊंना संगीताचं उपजतच वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थिदशेतच भारत गायन समाजाच्या बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटकं आणि सिनेमा बघण्याचं वेड त्यांना लागलं. त्यांची अभिनयातील समज पाहून त्यांना 'लपंडाव' या नाटकात अचानक संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी चीज केलं. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना 'सावकारी पाश' या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर भालजी पेंढारकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला; पण खर्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८मध्ये 'बलिदान'च्या माध्यमातून आणि त्यांना खरे यश मिळाले ते 'जिवाचा सखा' या चित्रपटाने.
नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपेंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता. त्यांच्या मराठी चित्रपटांव्यतिरिक्त चार हिंदी चित्रपटांनाही चांगलं यश मिळालं. त्यातील 'दो कलियाँ' हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. 'पुढचं पाऊल', 'ऊन पाऊस', 'देवघर' यांसारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. 'हा माझा मार्ग एकला' या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. 'पाठलाग' या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. नऊ फेब्रुवारी १९७९ रोजी राजा परांजपे यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment