जीवनवाहिनी नद्यांच्या संवर्धनाचा वारसा जपणारा स्तुत्य उपक्रम
सातारा : कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेली ऐतिहासिक दक्षिण काशी म्हणजेच आध्यात्मिक वारसा असलेल्या संगम माहुली येथे ब्राह्मण समाजाकडून वेण्णा-कृष्णा उत्सव गेल्या ३५० वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव २९ जानेवारीला सुरू झाला असून, तो एक फेब्रुवारी २०२६पर्यंत चालणार आहे. अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उत्सवासाठी सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते.
पुरोहितांच्या मंत्रोच्चारासह कृष्णा-वेण्णा नद्यांच्या जलपूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. सायंकाळी हजारो दिव्यांच्या प्रकाशात झालेली नदीच्या आरतीचा भव्य सोहळा हे उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार भजने सादर करतात, कीर्तने होतात. तसेच पारंपरिक लोककलाही सादर केल्या जातात. त्यामुळे संगमाचा परिसर भक्तिमय होतो.
अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या उत्सवाच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी सरपंच ओंकार कुलकर्णी यांनी उत्सवासंदर्भात अधिक माहिती दिली. या ठिकाणी केवळ उत्सवच साजरा केला जातो असे नव्हे, तर नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी उपस्थित नागरिकांकडून नदी संवर्धनाचा संकल्प करण्यात येतो.
संगम माहुली हे स्थान छत्रपती शाहू महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून साताऱ्याच्या वैभवशाली परंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न ब्राह्मण समाजाकडून करण्यात येतो. 'नद्या म्हणजे आपल्या संस्कृतीच्या जीवनवाहिनी आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने तरुणाईला आपल्या वारशाची ओळख करून देणे, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे,' अशा शब्दांत आयोजक समितीने आपली भूमिका मांडली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment