‘कामना साडी सेंटर’साठी १५ लाखांचे कर्ज; अमृतकडून ८६ हजार ३९९ रुपयांचा व्याज परतावा
केज : स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी इच्छा अनेक महिलांच्या मनात असते. मात्र, व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भांडवलाची जुळवाजुळव करणे हे मोठे आव्हान असते. केज येथील निकिता ऋषिकेश जोशी यांनी हे आव्हान स्वीकारत धारूर रोड येथे ‘कामना साडी सेंटर’ सुरू केले आहे. पती ऋषिकेश जोशी यांच्या सहकार्याने त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला आता अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेचीही मदत मिळाली आहे.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी निकिता यांनी उद्योजकतेविषयी माहिती मिळविण्यासाठी अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने केज येथे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित २१ दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रशिक्षणातून त्यांना व्यवसाय सुरू करण्याबाबत आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला.
त्यानंतर त्यांनी वैद्यनाथ सहकारी बँकेच्या केज शाखेतून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या रकमेतून साडी सेंटरसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. पती ऋषिकेश यांची साथ आणि प्रशिक्षणातून मिळालेले मार्गदर्शन यांच्या बळावर निकिता आता व्यवसायात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
### व्याज परताव्यामुळे मिळाला दिलासा
व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी निकिता यांनी अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेतला. त्यांना नुकताच ८६ हजार ३९९ रुपयांचा व्याज परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा झाला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
अमृत आणि MCED यांच्या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण, त्यानंतर बँकेकडून घेतलेले कर्ज आणि अमृतकडून मिळालेला व्याज परतावा, अशा प्रकारे निकिता यांच्या व्यवसाय सुरू करण्याच्या प्रवासात विविध टप्प्यांवर मदत मिळाली.
सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार
या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याबद्दल निकिता जोशी यांनी वैद्यनाथ सहकारी बँकेचे संचालक श्री. प्रवीण देशपांडे, समस्त ब्राह्मण संघर्ष समितीचे श्री. धनंजय कुलकर्णी, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विशाल जोशी, MCED चे श्री. दत्तात्रय क्षीरसागर आणि श्री. दिगंबर जोशी यांचे आभार मानले.
गृहिणी म्हणून घराची जबाबदारी सांभाळतानाच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निकिता यांचा निर्णय इतर महिलांसाठीही प्रेरणादायी आहे. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि योजनांचा लाभ मिळाल्यास व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणता येते, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते.
अमृत संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणापासून ते व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत मिळेपर्यंत लाभार्थ्यांना सहकार्य केले जात आहे. निकिता जोशी यांचे उदाहरण हे या प्रयत्नांचे एक सकारात्मक चित्र असून, त्यांच्या ‘कामना साडी सेंटर’ची वाटचाल यापुढेही यशस्वी व्हावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची पात्र लाभार्थ्यांनी माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी मदत होऊ शकते. अमृतच्या विविध योजना, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृतच्या बीड जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468
पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, हिंदू वीरशैव लिंगायतइत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment