महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत लक्षित गटातील महिला व युवतींसाठी उकडीचे मोदक बनविण्याचे मोफत प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षक सौ. अंजली किशोर मुळे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मोदक बनविण्याचे कौशल्य शिकवले.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने अमृत लक्षित गटातील महिला व युवतींसाठी उकडीचे मोदक बनविण्याचे मोफत प्रशिक्षण बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी अमृत मराठवाडा विभाग व जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रशिक्षणाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांना पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, या कौशल्याचा उपयोग करून घरातूनच छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षक सौ. अंजली किशोर मुळे यांनी महिलांना मोदकासाठी लागणारे साहित्य, उकड तयार करण्याची पद्धत, मोदकाला योग्य आकार देणे, चव आणि आकर्षक सादरीकरण याबाबत सोप्या पद्धतीने माहिती देत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी प्रशिक्षक सौ. अंजली मुळे यांचे स्वागत केले. तसेच अमृत सखी ऋचा शर्मा यांनी विजया कुलकर्णी यांचे स्वागत केले.
यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, विजया कुलकर्णी, अमृत सखी मंजू कुलकर्णी, अमृत सखी ऋचा शर्मा आणि अमृत मित्र रामेश्वर साळुंके यांची उपस्थिती होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment