माजलगाव तालुक्यातील कु. रसिका सुरेश ठाकूर (देशमुख) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळवत राज्य कर निरीक्षक पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
बीड, प्रतिनिधी : माजलगाव तालुक्यातील कु. रसिका सुरेश ठाकूर (देशमुख) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळवत राज्य कर निरीक्षक पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
रसिका यांचे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण माजलगाव येथील सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात झाले. त्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातून २०२० मध्ये संगणक विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले. उत्कृष्ट नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी राज्यात पाचवा क्रमांक पटकावत राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळवली.
रसिका यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे वडील सुरेश ठाकूर (देशमुख) गेल्या सुमारे वीस वर्षांपासून सिद्धेश्वर बँकेत नित्य ठेव (पिग्मी) प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तर आई स्नेहल ठाकूर खासगी शिकवणी घेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. मर्यादित साधनसंपत्तीतही मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि दिलेले प्रोत्साहन आज सार्थ ठरल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रसिका ठाकूर यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतला होता. या योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ साहित्य आणि मार्गदर्शन मिळविणे सुलभ झाले.
यशानंतर रसिका ठाकूर यांनी अमृत बीड जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अमृतच्या वतीने बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना रसिका ठाकूर म्हणाल्या, "अमृत संस्थेचे अधिकारी व कर्मचारी अत्यंत सहकार्यशील आहेत. अभ्यासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे मला मुख्य परीक्षेची तयारी अधिक सक्षमपणे करता आली. आवश्यक पुस्तके आणि संदर्भ साहित्य खरेदी करण्यास मदत झाली. या सहाय्यासाठी मी अमृत संस्थेची मनःपूर्वक आभारी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अधिकाधिक युवक-युवतींनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषतः आता सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी अर्थसहाय्य योजनेचा लाभ विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे."
रसिका ठाकूर यांचे यश हे ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग केल्यास मोठे ध्येय गाठता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment