हिंगोली जिल्ह्यात लवकरच अमृत शासन विद्यार्थी संवाद सेतू उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याअनुषंगाने विविध महाविद्यालयांतील शिक्षकांनी अमृत जिल्हा कार्यालयास भेट देऊन उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
हिंगोली जिल्ह्यात अमृतच्या वतीने लवकरच "अमृत शासन विद्यार्थी संवाद सेतू" हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व शिक्षकांनी अमृत जिल्हा कार्यालयास भेट देऊन उपक्रमाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी अमृत कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उपक्रमाची उद्दिष्टे, राबविण्याची कार्यपद्धती, विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे नियोजन, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच विद्यार्थी व शासन यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षकांनी उपक्रमाचे स्वागत करत महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि कौशल्य विकासाच्या संधींची माहिती प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. हिंगोली जिल्ह्यात लवकरच हा उपक्रम सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांशी जोडणे, त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीला चालना देणे आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे अमृत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment