नांदेड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान' अंतर्गत आयोजित विशेष शासकीय सेवा शिबिरात अमृत संस्थेने सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेच्या स्टॉलद्वारे विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
नांदेड, दि. २२ जुलै : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपविभागीय कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान' अंतर्गत विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन ओम गार्डन, कौठा (नांदेड दक्षिण मतदारसंघ) येथे करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज भरण्याची सुविधा आणि योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी अमृत संस्थेला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. अमृत संस्थेच्या स्टॉलद्वारे अमृत च्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. यासोबतच डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. कर्डिले, आमदार श्री. हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार श्री. अनंत बोंढारकर, महापौर मुळे मॅडम, तहसीलदार श्री. संजय वारकड, उपविभागीय अधिकारी श्री. सचिन खल्लाळ यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अमृत संस्थेच्या EDP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले. शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या स्टॉलला भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. स्टॉलवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भेट देत विविध योजनांची माहिती घेतली, अनेक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तसेच विविध योजनांचे अर्जही भरून घेण्यात आले. या कार्यक्रमात अमृत नांदेड टीमचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी, जिल्हा उपव्यवस्थापक(DEO) श्री. विश्वेश्वर जोशी, अमृत सखी श्रीमती मनीषा कुणसावळीकर, संगणक सखी ऋतिका, संजना तसेच श्री. आशिष पांडे आणि श्री. चिन्मय पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या माध्यमातून अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचली आणि लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment