उत्सवाच्या निमित्ताने स्वामींची सात वेगवेगळी रूपे साकारली जात आहेत. पहिल्या दिवशी स्वामींची पारंपरिक वेशभूषा करण्यात आली. त्यानंतर अनुक्रमे बालाजी, राम-लक्ष्मण, खंडेराया, शिव-पार्वती आणि विठ्ठल-रुक्मिणी या रूपांत स्वामींचे दर्शन भाविकांना घडले. आज स्वामींना शेषनारायणाचे रूप धारण करून सजविण्यात येणार असून, उद्या दिनांक २३ जुलै रोजी पारंपरिक पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.
जालना, प्रतिनिधी : जालना शहराचे आराध्य दैवत तसेच 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी मंदिरात आषाढी उत्सवानिमित्त स्वामींच्या विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. उत्सवादरम्यान स्वामींची दररोज वेगवेगळी अशी सात रूपे साकारली जात असून, या आकर्षक वेशभूषा भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देत आहेत. श्री आनंदी स्वामी मंदिराचा इतिहास सुमारे सतराव्या शतकापासूनचा असल्याचे मानले जाते. आनंदी स्वामी महाराजांनी इ.स. १७२६ मध्ये जालना येथे समाधी घेतल्यानंतर या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले. तेव्हापासून महावद्य अष्टमीला उत्सव, दास नवमीला काला आणि आषाढ अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत मंदिर परिसरात यात्रा भरविण्याची परंपरा अखंड सुरू आहे. मंदिरात इ.स. १९४७ पासून नित्यनेमाने पालखी सोहळा काढला जात आहे. विशेष म्हणजे निजामकालातही ही परंपरा अखंड सुरू होती. उत्सव काळात कीर्तन, भजन, धार्मिक प्रवचने यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सायंकाळी सात वाजता होणाऱ्या स्वामींच्या आरतीसाठी परिसरासह दूरदूरच्या भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. उत्सवाच्या निमित्ताने स्वामींची सात वेगवेगळी रूपे साकारली जात आहेत. पहिल्या दिवशी स्वामींची पारंपरिक वेशभूषा करण्यात आली. त्यानंतर अनुक्रमे बालाजी, राम-लक्ष्मण, खंडेराया, शिव-पार्वती आणि विठ्ठल-रुक्मिणी या रूपांत स्वामींचे दर्शन भाविकांना घडले. आज स्वामींना शेषनारायणाचे रूप धारण करून सजविण्यात येणार असून, उद्या पारंपरिक पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे. स्वामींच्या विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी जालना शहरासह जिल्ह्यातील तसेच राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल होत आहेत. प्रत्येक दिवसाचे वेगळे रूप आणि भक्तिमय वातावरण यामुळे आनंदी स्वामी मंदिरातील आषाढी उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment