जागतिक लोकसंख्या दिन

वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्त लोकसंख्या या विषयातील माहिती देणारा हा लेख-

जागतिक लोकसंख्या दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?
वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपली भूमिका निभावली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येने जगातील बहुतांश देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केले आहे. त्याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत आहे. लोकसंख्या विस्फोट ही एक गंभीर चिंता आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते.

११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने सन १९८९ मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी जगातील लोकसंख्या सुमारे ५०० कोटी होती. आणि यावर्षीच ५०० कोटीवे बालक जन्माला आले, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो.

वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी समाजातील भरपूर लोकांना एकत्रितपणे सहभागी करून घेऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखून आणि कृती आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. यामध्ये चर्चासत्रातील चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कलात्मक काम, घोषणा, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश यांचे वितरण, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, गोलमेज चर्चा, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आणि इतर अनेक माध्यमांतून बातम्यांचे वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचा समावेश असतो. लोकसंख्यावाढीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य संघटना आणि लोकसंख्याविषयक विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यासाठी परिषदा, संशोधन कार्ये, बैठका, प्रकल्प विश्लेषण इत्यादी अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते. वाढती लोकसंख्या हे विकासासमोरचे एक प्रचंड मोठे आव्हान आहे. समाजातील जास्तीत जास्त कुटुंबे छोटी आणि आरोग्यपूर्ण असावीत आणि लोकांना शाश्वत भवितव्य मिळावे, यासाठी मोठी पावले उचलली गेली आहेत. प्रजननविषयक आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा मागणीनुसार पुरवठा व्हावा, या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली आहे. प्रजननविषयक आरोग्यात सुधारणा करून आणि लोकसंख्यावाढीचा दर घटवून सामाजिक दारिद्र्य कमी करण्यासाठीही पावले उचलली गेली आहेत.

जगभरात गर्भवती महिलांचे अस्वस्थ आरोग्य आणि त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे प्रजननविषयक आरोग्याच्या समस्या हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा विकासविषयक कार्यक्रम (UNDP)’ त्याकडे आता विशेष लक्ष देत आहे. जागतिक स्तरावर प्रसूतीदरम्यान दररोज सुमारे ८०० महिलांचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी लोकसंख्या दिनाची मोहीम ‘प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन’ याविषयी जगभरातील लोकांची माहिती आणि कौशल्य वाढवण्याचे काम करते.

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे

• मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणांचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.

• तरुण-तरुणींना आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.

• संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.

• कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.

• मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.

• मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.

• मूलभूत प्राथमिक आरोग्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जोडप्याला प्रजननविषयक आरोग्य सेवा सहजगत्या सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे.-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 12:24 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement