प्रकाशाची शलाका...!!

सातारा येथे प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून रुजू झालेल्या मनीषा आव्हाळे मॅडमची पहिली पोस्टिंग आज सोलापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाल्या आहेत. त्यांच्या जिद्दीची आणि कष्टाची ही यशोगाथा-

प्रकाशाची शलाका...!! मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्रकाशाची शलाका...!!


गोष्ट आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळनाथ तालुक्यातील सायखेडा गावची... १३०० लोकवस्तीचे गाव आहे. पश्चिम विदर्भातील कोरड्या भागात मोडणारे... पाण्याचा दुष्काळ पाचवीला पुजलेला... गाव जरी विदर्भात येत असले तरी मराठवाड्याच्या जवळ असल्यामुळे बोलणे, चालणे आणि पीक पद्धतीमध्ये बरंच साम्य आहे... 'अठरा विश्व दारिद्र्य हे कर्माचे भोग आहेत' हा समज जनमानसात दृढ झालेला... गोष्ट यासाठी सांगतोय की, क्रांतीचा जन्म कुठे होतो? चार वर्षांपूर्वी सौ. संगीता आव्हाले यांनी गळ्यातले मंगळसूत्र विकून घरात स्वच्छालय बांधले होते... मी या गावात जाऊन त्या महिलेवर विशेष स्टोरी केली होती, त्यावेळी या स्टोरीला खूप व्यापक प्रसिद्धी मिळाली होती... दिल्लीपासून मुंबईपर्यंत गौरव झाला होता. एखाद्या गावाचे पाणी जिद्द देणारे असते... ह्या पहिल्या यशोगाथेनंतर अशीच एक यशोगाथा याच गावातली...


माणिकराव आव्हाले हे कष्टकरी म्हणजे शेतकरी, शिक्षण जेमतेम दहावी. कमी शिक्षण ही त्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात अतिशय सामान्य बाब होती. मुलांच्या शिक्षणाची ही तऱ्हा असताना मुलींच्या शिक्षणाचे काय चित्र असेल? 'अक्षर ओळख व्हावी म्हणून शाळेत घालण्याएवढे शिक्षण पुरेसे आहे', अशी तेथील मानसिकता होती. 'शिकून लै काय कलेक्टर होणार हाय का?" हा त्या काळातला सर्वसामान्य विचार होता. त्यामुळे माणिकराव आव्हाले यांच्या पत्नी जेमतेम चौथी शिकलेल्या होत्या. मुळात माणिकराव हे प्रागतिक विचारांचे होते, त्यामुळे शिक्षण हे बदलाचे मोठे माध्यम आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती; म्हणून त्यांनी त्यांची मुलगी मनीषाला लहानपणापासून शिकायला चक्क पुण्यात पाठवले... गाव फक्त सुट्टीपुरते मर्यादित असल्यामुळे तिचा पूर्ण फोकस अभ्यासावर राहिला. सिंहगड कॉलेजमधून बारावी केल्यानंतर तिने थेट आय.एल.एस. मधून विधी पदवी घेतली. आय.ए.एस. व्हायचे हे बीज अगोदरच मनात पेरले होते आणि वडिलांनी संस्कारांची मशागत करताना या स्तंवप्नाला खतपाणी घातले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मर्म समजून घेऊन ती थेट दिल्लीला पोहोचली आणि 'आय.ए.एस. होण्यासाठी तिने गुरुकुल वाजीराम गाठले'. या अथक परिश्रमाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले ते आय.आर.एस. च्या रूपात! मात्र मनीषाचे स्वप्न होते ते आय.ए.एस. चे. तिच्या जिद्दीने २०१८-१९ मध्ये या यशाला गवसणी घातली... गाव खेड्यातल्या माणिकराव आव्हाले यांची लेक... सायखेड्याची मुलगी... ज्या गावातल्या महिलेने स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र विकले, त्या गावाच्या या कन्येने देशात ३३ व्या रँकने आणि महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकाने 'आय.ए.एस.' मध्ये यश प्राप्त केले... मेहनतीला फळ आले आणि तिला महाराष्ट्र कॅडर मिळाले... आणि पहिले प्रशिक्षणार्थी पोस्टिंग साताऱ्यात मिळाले... त्या सर्व गोष्टी ती खूप बारकाईने शिकून घेत आहे. माझ्यासारख्याच एका खेड्यातल्या शेतकऱ्याची लेक "आय.ए.एस.' झालेली बघणे म्हणजे खूप भावनिक गोष्ट होती. मुळातच "शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी" या उक्तीप्रमाणे शालीनता, नम्रता हे गुण पदोपदी जाणवणाऱ्या मनीषा आव्हाले मॅडम आल्या, प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालये दाखवली... त्यांनी सर्वांची कार्यपद्धती जाणून घेतली... माझ्या कार्यालयात आल्या... माझ्या खुर्चीत बसल्या, मला झर्रर्रकन माझी आई, बहीण आणि अशा शेकडो गाव-खेड्यातल्या स्त्रिया दिसल्या... खूप धन्यता वाटली... दोन पिढ्या मागे सरकारी कचेरीत कागदपत्रांवर सही मागितली तर अंगठा पुढे करणाऱ्या पिढीची ती वारसदार आहे. आय.ए.एस. होणे माझ्या लेखी खूपच अभिमानाची आणि इथून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. वाशिम जिल्ह्याची पहिली लेक 'आय.ए.एस.' झाली... एकच वाक्य आठवले... तमसो मा ज्योतिर्गमय... सावित्रीच्या हजारो, लाखो लेकींच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण होवो, त्या कर्तबगार आणि आत्मसन्मानाचे प्रतीक बनोत!

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 09:06 AM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 07-07-2026 News publication date | Time: 09:06 AM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement