बोधकथा-५३
या जगात कोणालाही निर्भेळ सुख आणि दुःख मिळत नाही. सर्वांना सदाकाळ सर्वकाही अनुकूल असेलच असे नाही. जीवनाचे हे स्वरूप लक्षात घेऊन आपल्या वाट्याला आलेले दुःख शांतपणे सोसले तरच मन विचलित होणार नाही. दुःखाचा स्वीकार केला तर त्याची टोचणी कमी होते.
भगवान बुद्ध ज्या गावात उतरले होते, त्याच गावात एका स्त्रीचा पती मरण पावला. पतीच्या निधनाने ती आक्रोश करू लागली. तेव्हा काही लोकांनी तिला भगवान बुद्धांना भेटायला सांगितले. बुद्ध तर भगवंत आहेत, ते काहीही करू शकतात या आशेने ती भगवान बुद्धांकडे गेली. त्यांच्याकडे जाऊन तिने आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्याची याचना केली. भगवान बुद्ध म्हणाले, “ज्या घरात कोणीही मरण पावले नाही, अशा घरातील मोहरी तू घेऊन ये. माझ्या कमंडलूतील तीर्थात मी ती मोहरी घालीन. त्या मोहरीचे पाणी शिंपडताच तुझा नवरा जिवंत होईल.” त्या स्त्रीने अशा घरातील मोहरी मिळविण्यासाठी प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावला. पण त्या प्रत्येक घरात कोणी ना कोणी मेले होते. उलट तिला तिच्यापेक्षा अधिक दुर्दैवी आणि दुःखी स्त्रिया भेटल्या. हे सगळे पाहून तिला एक नवीन दृष्टी लाभली. ह्या सगळ्यांच्या मानाने आपण थोडेसे सुखीच आहोत याची तिला जाणीव झाली.
जगात आपल्यापेक्षा कितीतरी दुःखी जीव आहेत. त्यांच्या तुलनेने भगवंताने आपल्याला कितीतरी जास्त सुख दिलेले आहे, ह्या भावनेने आपण जगले पाहिजे. जे आणि जे आजपर्यंत मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.
संदर्भ- संस्कारांचे मोती
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment