महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे.
अमृत संस्थेमार्फत पर्यटन उद्योजकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम...
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था असलेल्या अमृत (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देणे, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढवणे आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन क्षेत्र हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून त्यामध्ये व्यवसाय विस्तार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक युवक-युवती व उद्योजकांना मिळावा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, पर्यटक मार्गदर्शक, कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षणादरम्यान व्यवसाय उभारणी व विस्तार, प्रभावी व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शनही मिळणार आहे.
पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९. मो. क्र. : ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment