ज्येष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर स्मृतीदिन

बहुरंगी, बहुआयामी, स्वच्छंद व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर यांचा आज स्मृतीदिन,त्यानिमित्त वाचा त्यांचा साहित्यिक आणि रोमांचक जीवनप्रवास

ज्येष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर स्मृतीदिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

गो.नी. दांडेकर म्हणजे केवळ लेखक नव्हे, तर ते एक भरभरून जगणारे व्यक्तिमत्व होते. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारे बहुरंगी, बहुआयामी, स्वच्छंद व्यक्तिमत्व. बालवयातच स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याच्या ओढीने घर सोडलं आणि हा देश पाहण्याच्या इच्छेने महाराष्ट्रभर भ्रमण केलं. तळकोकण आणि सह्याद्रीचे सौंदर्य त्यांच्या नसानसात भिनलं होते. त्यांचा जन्म विदर्भातला होता. गो.नी. दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी परतवाडा येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षी सातवीतून शाळा सोडून ते संत गाडगेबाबांच्या सान्निध्यात आले. त्यांच्याच उपदेशाने त्यांनी गावोगावी भटकंती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाल्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा अनेक साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनातून समाजात घडणाऱ्या घडामोडींवर फक्त प्रतिक्रिया व्यक्त झालेली नसते, तर तो अनुभवसंपन्न आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा आहे. त्यांच्या लेखनातील वेदनाही अस्सल आणि विचारही नवा आहे. विदर्भातला जन्म असूनही त्यांना आकर्षण होते कोकणाचे! त्यांच्या लेखनातून बागा, तळी, नद्या, शेते यातून तिथला माणूस किती समृद्ध आहे, याची आपल्याला कल्पना येते. तिथल्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे गुण-दोष, स्थानिकांच्या अडचणी आणि त्यांची मानसिकता याचे यथार्थ दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. यातून आपण त्या पात्राशी स्वतःला जोडून घेतो आणि मग पुस्तकांचा आणि आपला प्रवास एकत्र सुरू राहतो. कोकणाचे वर्णन करणारी त्यांची अनेक पुस्तके आहेत, त्यात 'शितू' आणि 'पडघवली' ही दोन कायम लक्षात राहण्यासारखी पुस्तके आहेत. यात ते केवळ वर्णनात्मक न लिहिता तेथील समाजव्यवस्थेचाही आपल्याला अंदाज येतो. चित्रपाषाणांचा त्यांचा संग्रह होता, ज्यातूनच त्यांची सौंदर्यासक्ती दिसून येते. रंगीबेरंगी दगड, स्फटिकासारखे असंख्य पैलू असणारे शुभ्र आणि पारदर्शक दगड, गुलाबी-जांभळी छटा असणारे दगड त्यांनी जमवले होते. सह्याद्रीत दुर्गभ्रमंती करताना जमवलेला हा खजिना आणि पाहिलेले निसर्गवैभव त्यांनी 'दुर्गभ्रमणगाथा' या लेखन रूपाने साकारले आहे. त्यात केवळ १७-१८ किल्ल्यांचे वर्णन आहे आणि त्यातही राजगडाविषयी जास्त लिहिले आहे. किल्ल्यांविषयी लिहिताना ते त्या किल्ल्यावरील वनसंपदा, वृक्षवल्ली, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल सुद्धा सांगतात. किल्ल्यावर वस्ती असेल, तर त्या माणसांविषयी ते न चुकता लिहितात. हा किल्ला कोणत्या काळात कसा कसा बदलत गेला, हे सांगताना त्याची वास्तुरचना, राजकीय आणि संरक्षणदृष्ट्या त्याचे महत्त्व, अशा अनेक मुद्द्यांचा सखोल अभ्यासपूर्वक केलेला आढावा त्यांच्या या पुस्तकातून समजतो. किल्ल्यावर बसून घालवलेल्या चांदण्या रात्री आणि सूर्यास्ताच्या वेळी कड्यावरून दिसणारे खालचे हिरवे चमचमते तळकोकण वाचताना मोह पडतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा या देशातील संपन्न राजवटींनी हे किल्ले बांधले आणि वापरले आहेत. मात्र, जवळजवळ सर्वच किल्ल्यांचे आज दिसणारे रूप हे शिवकाळातलेच आहे; या इतिहासाची आठवण ते करून देतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे दुर्गभ्रमंती केली. या काळात त्यांनी गडकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे 'गोनीदांची दुर्गचित्रे' या नावाने एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. 'दुर्गदर्शन', 'किल्ले', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू' आणि 'माचीवरला बुधा' या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. स्मरणगाथेमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंना वाचकांसमोर मांडले आहे. गाडगेबाबांचा सहवास, ज्ञानेश्वरीचे वाचन-पठण, महाराष्ट्र भ्रमंती, परिक्रमा आणि जीवनासाठी करावा लागलेला संघर्ष या सगळ्याचे वर्णन त्यात आहे. कुणा एकाची भ्रमणगाथा नर्मदा परिक्रमेवरच आहे. घरातून पळून गेल्यानंतर त्यांना लाभलेली संत गाडगेबाबांची संगत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. कीर्तने आणि निरूपणांचा छंद लागला; महाराष्ट्र भ्रमंतीमुळे ज्ञानेश्वरी, वेद अशा पौराणिक साहित्याशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यांनी समर्थ रामदासांचे चरित्रही लिहिले. समर्थ रामदास आणि त्यायोगे छत्रपती शिवाजी महाराज, निसर्ग, वनस्पती, तत्कालीन समाजव्यवस्था, गावांच्या वसाहतींच्या पद्धती या सर्व गोष्टी यात दिसतात. समर्थ रामदासांनी केलेले कार्य आणि घडवून आणलेली निशस्त्र क्रांती यातून स्पष्ट होते. समर्थ रामदासांचे संघटन, बलोपासना आणि भक्ती हे गुण त्यांचे चरित्र वाचताना ठळकपणे दिसून येतात. त्यांनी चित्रपट लेखन देखील केले. अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे 'जैत रे जैत'. गो. नी. दांडेकर सन १९८१ मध्ये अकोला येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक 'स्मरणगाथा'ला १९७७ मध्ये 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार मिळाला. तसेच, पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय 'डी. लिट.' पदवी दिली. महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने 'नगरभूषण', तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी 'साहित्य वाचस्पती' म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय, नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा 'नानासाहेब नारळकर' पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा 'दुर्गप्रेमी' पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. १ जून १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! -संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement