अमृत संस्थेकडून पहिल्या सहामाहीकरिता मिळाले ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य
वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. देशातील नामांकित केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्याची महत्त्वपूर्ण योजना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ आर्वी येथील निधी राजेश चांडक या विद्यार्थिनीला मिळाला आहे.
निधी सध्या प्रयागराज येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (अलाहाबाद) येथे बीटेकचे शिक्षण घेत आहेत. अत्यंत कठीण व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेत यश संपादन करून त्यांनी या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला आहे. त्यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे त्यांनी आपल्या शैक्षणिक स्वप्नांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
अमृत संस्थेकडून निधीला चालू वर्षातील पहिल्या सहामाहीसाठी ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य प्रदान करण्यात आले आहे. या आर्थिक साह्यामुळे निधीच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना निधी चांडक म्हणाली, 'अमृत संस्थेच्या या योजनेमुळे मला मोठा आधार मिळाला आहे. आर्थिक साह्यामुळे माझ्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. मला मिळालेल्या या अर्थसाह्याचा मी माझ्या शिक्षणासाठी सर्वोत्तम उपयोग करीन. अमृत संस्थेची मी मनःपूर्वक आभारी आहे.'
निधीचे वडील राजेश चांडक यांनीही समाधान व्यक्त करून सांगितले, की 'अमृत संस्थेने पालकांप्रमाणे निधीच्या शिक्षणाचा भार उचलला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.'
या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन करून समन्वय साधल्याबद्दल निधी चांडक आणि तिच्या परिवाराने अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे, तसेच जिल्हा उपव्यवस्थापक धीरज राठी यांचे विशेष आभार मानले.
निधीचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून अमृत संस्थेने तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य संधी मिळाल्यास छोट्या शहरातील विद्यार्थीही देशातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, याचे उत्तम उदाहरण निधी चांडकने दाखवून दिले आहे. अमृत संस्था अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३२
पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
प्रशासकीय भवन, तळमजला,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाइन, वर्धा
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment