रमाकांत एकांत काळी भजावा

श्री समर्थ रामदासस्वामींचा संदेश

रमाकांत एकांत काळी भजावा मुख्य फोटो
रमाकांत एकांत काळी भजावा अतिरिक्त फोटो

श्री समर्थ रामदास स्वामी रचित प्रसिद्ध मनाचे श्लोक म्हणजे मराठी भाषेतील गीताच होय. बालमनावर संस्कार करण्यासाठी, प्रौढांना समयी योग्य मार्गदर्शनासाठी व वृद्धांना सहानुभूतिपूर्वक दिलासा देऊन अंतिम हित‌साधनास प्रवृत्त करण्यासाठी अशा विविध प्रकारे या मराठी गीतेचा उपयोग घरोघरी होत आहे. 

गेली पावणेचारशे वर्षे समर्थांचे मनाचे श्लोक समाजाचे प्रबोधन करत आले आहेत. पहाटेच्या वेळेस उच्च स्वरात एकेक श्लोक म्हणत लोकांना जागवत रामदासी भिक्षेसाठी फिरत त्यातून लोकांना, जनतेला परमार्थाकडे वळविणे, परकीय सांस्कृतिक बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा देत धर्मग्लानीतून उठवणे, राघवाच्या भक्तीत सर्वांना रमवणे, तसेच राष्ट्राप्रति कर्तव्याची जाणीव करून देणे हा त्यामागील उद्देश असे. 

श्री स्वामी समर्थ म्हणतातही, मना कोणताही छोटा संकल्प मनात ठेवू नकोस. नेहमी सत्यावर आधारित विचार चित्तात-मनात ठेव. लोकांमध्ये व्यर्थ बोलणे आणि विकल्प, संशय सोडून दे आणि एकांतात फक्त रामाचे भजन कर. सत्य संकल्प हा शाश्वताची दिशा दाखवतो. अशाश्वताची इच्छा करण्यापासून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे नसते. या जगातील व्यवहाराला स्थळ व काळाचे बंधन आहे. आज आपल्याला वाटणारे सुखाचे प्रसंग, घटक, परिस्थिती बदलली की ते सुखाचे वाटत नाहीत. जगापासून उत्पन्न होणारे संकल्प हे मनाला स्वार्थी व अहंकारी होण्यास मदत करतात. मग मनुष्य स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाही आणि तो अहंकारी बनतो. अहंकारात शहाणपण, सद्बुद्धी क्षणार्धात नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे माणसाच्या वृत्तीवर परिणाम होतो, वृत्तीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे सामर्थ्य बुद्धीत, विवेकात असते. आपले ध्ये‌य गाठण्यासाठी, समाधान टिकवण्यासाठी संकल्पाप्रमाणे विकल्प, संशय निर्माण करू पाहणाऱ्या घटनांकडे, त्याच्या वृत्तीवर होणारे परिणामांकडे लक्ष्य ठेवावे लागते. म्हणून समर्थ म्हणतात, 'रमा‌कांत एकांतकाळी भजावा' यात हाच उपदेश केला आहे आणि त्यासाठी एकांतकाळी देवाला कसे भजावे, ते सांगितले आहे.

मनोव्यापार कसा घालतो हे आपल्याला समजले किंवा आपण हे जाणले तर मनात आशा, आकांक्षा, वासना, कामना, इच्छा इत्यादी निर्माण झाले की मन संकल्प करते. संकल्प चांगला असेल, तर त्याच्या साह्याने ध्येय गाठण्यात जीवनाचे सार्थक आहे. समाजात वावरताना आपला अनेकांशी संपर्क येतो. सभोवताली ज्या काही घटना घडतात, जे काही प्रसंग घडत असतात, त्याचा मनावर परिणाम होत असतो. लोकांचे वागणे पाहून आपणही तसे वागावे, असेदेखील कधी कधी वाटून जाते आणि त्याचे आकर्षण वाटून आपणही लोकांचे अनुकरण करू लागतो आणि त्यातूनच मग क्षुद्र, अल्प संकल्प तयार होतात. म्हणून मनाला उपदेश करताना श्री समर्थ पहिल्याच ओळीत म्हणतात, 'मना तू अल्प, स्वल्प संकल्प तयार करण्याच्या भानगडीत पडू नकोस आणि मनाची शक्ती वाया घालवू नकोस. संकल्प करणे हा मनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे मन काही ना काही संकल्प करतच राहणार. तेव्हा संकल्प करायचा तर तो नेहमी सत्य संकल्प करावा. सत्य संकल्प चांगल्या ध्येयाकडे घेऊन जातो. क्षुद्र संकल्पातून आनंदाचे मायाजाळ दिसत असले, तरी ते अंतिमतः दुःखाला कारणीभूत होते आणि मनस्तापाशिवाय काही हाती लागत नाही. भव्य, चांगले करण्यासाठी चढाओढ करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेताना त्या जगदीश्वरासमोर जे शब्द उच्चारले, त्यात चारित्र्य, नीतिमत्ता, शौर्याची छाप होती. 'मी भारतवर्षातील सर्व तीर्थक्षेत्रे यातनांमधून मुक्त करीन,' असा सत्संकल्प असावा. अल्प संकल्प नसावा. सत्यसंकल्प शाश्वताची दिशा दाखवतो. समर्थांच्या मते परमेश्वर ब्रह्मस्वरूप हे शाश्वत आहे. म्हणून मनातील स्वार्थ व अहंकाराला काढून टाकून शाश्वत परब्रह्माकडे वळवले, तर मनाला समाधान सापडते व ध्येयप्राप्ती होते. या ध्येयप्राप्तीमुळे मानवी जीवनाचे सार्थक होते. 

या मार्गातील दोन विक्षेपांचा समर्थ उल्लेख करतात. ते म्हणजे जल्प आणि विकल्प. त्यांचा त्याग करण्यास समर्थ सांगतात. जल्प म्हणजे विनाकारण केलेली बडबड. काही लोकांना ध्येय प्राप्त झाल्याचे इतके कौतुक असते, की आजूबाजूच्या मंडळींत सतत त्याच विषयावर बडबड करून आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोक नाना तऱ्हेच्या शंका उपस्थित करतात. त्या ऐकल्यावर त्यांच्या मनात साध्याविषयी संशय निर्माण होतात. याला विकल्प म्ह‌णतात. संशय बाहेरूनच येतात, असे नव्हे, तर काही माणसांना स्वतःच विकल्प निर्माण करण्याची सवय असते. परमेश्वरप्राप्ती हे एकदा ध्येय ठरले तर एकांतात राहून परमेश्वर चिंतन करावे, असे समर्थ म्हणतात. एकांतात बडबड आपोआपच कमी होईल. चित्त विचलित होणार नाही. मन एकाग्र होण्यास मदत होईल.

माणसाचे मूळ मन हे आहे. मन आपल्याला प्रेरणा देते. मन नसते तर माणूस नसता. जिथे माणूस तिथे मन. मन नेहमी द्वंद्वात असते. तुकारामांनी सांगित‌ले, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग का? तर मन हेच रणांगणच आहे. त्याच्यावर सतत इकडून तिकडून प्रश्न निर्माण होतात. मन इंद्रियांचे प्रेरक आहे. इंद्रियांनी काय करायचे? कुठे जाय‌चे?, हे मन सांगते' आणि ते सारखे द्वंद्वात जाते. कर्म मनाने होते. देहाने इंद्रियाने होत नाही.

परमेश्वराच्या भक्तीचा संकल्प धरता येत नाही. 'मी एका तासात एक कोटी वेळा देवाचे नाव घेऊ शकेन, अशी माझी भक्ती आहे,' अशा प्रकारच्या वायफळ गप्पा मारू नयेत. गोस्वामीजी म्हणतात, 'रामनाम मनिदीप धरू जीह देहरी द्वार। तुलसी बिहतर बाहेरहुँ जो चाहसी उजियार”- रामनाम घेत बसायचे म्हटले तर माझा फायदा होईल ना, तो नक्की पावेल ना, की तसे काहीच नसते, अशा प्रकारचे विकल्प मनात आणू नये. कुशंका घेऊ नयेत आणि हे असे सत्संकल्पापासून विचलित करणारे प्रश्न विचारणे टाळण्यासाठी, वायफळ बडबड करणे टाळण्यासाठी लोकांच्या वर्द‌ळीपासून दूर एकांतात बसून रमाकांत श्रीहरीचे म्हणजेच सीताकांत रामाचे भजन, चिंतन करावे.

जसा उंबरठ्यावर लावलेला दिवा अंगणात आणि घरातही प्रकाश देतो, त्याप्रमाणे रामनाम घेणाऱ्या व्यक्तीच्या लौकिकामध्येही प्रकाश आणि अलौकिकामध्येही प्रकाश देतो. राम राम असे म्हणणे सोपे आहे, त्यात कोणतेही जोडाक्षर नाही. मन स्थिर करण्यासाठी राघवाशी अनुसंधान करा. हे रामनाम स्मरण म्हणजे, अ‍ॅक्सिलरेटरसारखे आहे. अ‍ॅक्सिलरेटरने गाडी पुढे जाते. ती रामनामाच्या दिशेने जाते, हे व्यावहारिक सत्य आहे. नामस्मरण भक्तीचा प्राण आहे.

अरे मानवा नीट विचार करून पाहशील, तर श्रीराम हेच एक उपासनेकरिता आदर्श दैवत आहे, हे सहज कळून येईल. उत्तम जीवनघडणीच्या दृष्टीने श्रीरामाच्या ठायी असलेल्या महान सद्गुणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अचूक लक्ष्यवेध सामर्थ्य असलेला, प्राणान्तीही न ढळणारा म्हणून एकवचनी. दैनंदिन जीवनही इतके शुद्ध व प्रभावी, की त्यामुळे अनेक जीव अनायासे उद्धरून गेले. जगाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर निरनिराळी रूपे धारण करतो. म्हणून मनोवासना ही रामरूपातच विलीन व्हायला हवी आणि रमाकांत एकांतकाळी भजावा, हे सर्व होण्यासाठी सज्जनांची संगती करावी.

जय जय रघुवीर समर्थ 

- सौ. शुभांगी सतीश ऋषी, भंडारा

Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 04:34 PM News publication time | Views: 186 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 04:34 PM News publication time | Views: 186 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement