सर्वांनाच नवी ऊर्जा देणारे कार्य
अमरावतील जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री सन्मान देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास, स्वच्छता, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रनिर्मितीचा जो संदेश दिला, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे महान कार्य जनार्दन बापूराव बोथे यांनी केले. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने आयुष्य अर्पण करणारे जनार्दन बोथे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
ग्रामीण भागातील जनजागृती, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यामुळे अनेक गावांमध्ये स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ झाली.
जनार्दन बोथे गुरुजींनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवेचा वसा आयुष्यभर जपला. त्यांच्या कार्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि समाजाप्रति असलेली प्रामाणिक बांधिलकी दिसून येते. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून समाजसेवा, ग्रामविकास आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा गौरव आहे. पद्मश्री जनार्दन बापूराव बोथे यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून, समाजहितासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारे आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment