आंध्र प्रदेशातील तरुण शेतकऱ्याची गोष्ट
ज्या काळात अनेक अभियांत्रिकी पदवीधर कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत आहेत, जीवघेण्या स्पर्धेत उतरत आहेत, त्याच काळात आंध्र प्रदेशमधील भीमवरम येथील मल्लुला श्रीनिवास राव यांनी पूर्णपणे वेगळी वाट निवडली आहे, ती म्हणजे शेतीची. आज हा तरुण कृषी-उद्योजक तंत्रज्ञान आणि शेती यांच्या अनोख्या संगमातून ग्रामीण कृषी व्यवस्थेचे आधुनिकीकरण करून शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येऊ शकते याचे जिवंत आणि आदर्श उदाहरण ठरला आहे.
भीमवरम येथील एसआरकेआर अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक पदवी प्राप्त केलेल्या श्रीनिवास राव यांनी वर्ष २०१२मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास दोन वर्षे एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले; मात्र शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना हळूहळू शेतीविषयी विशेष आकर्षण निर्माण होऊ लागले. त्यांनी आपल्या मातीत परतण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये त्यांनी अध्यापनाची नोकरी सोडून पश्चिम गोदावरी जिल्ह्यात जवळपास ५० एकर भाडेतत्त्वावरील जमिनीवर भातशेती करण्यास सुरुवात केली. मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादनखर्च हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत असताना, श्रीनिवास राव यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला. २०२१मध्ये त्यांनी विजयवाडा येथे कृषी फवारणीसाठी वापरला जाणारा ड्रोन खरेदी करून ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला. हे तंत्रज्ञान कीटकनाशक फवारणीसाठी अत्यंत परिणामकारक ठरले. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले. तसेच पाणी आणि वेळेचीही मोठी बचत झाली. सारे सुरळीत सुरू झाले असे वाटत असतानाच त्यांच्या ड्रोनमध्ये एकदा तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यांनी हार मानली नाही. उलट, ते हैदराबादला गेले, कमी किमतीत सुटे भाग खरेदी केले आणि खराब झालेल्या उपकरणातील भागांचा उपयोग करून २०२४मध्ये केवळ चार-पाच लाख रुपयांच्या खर्चात नवीन कृषी ड्रोन तयार करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या या नवकल्पनेचेच पुढे अत्यंत किफायतशीर अशा ग्रामीण उद्योगात रूपांतर झाले. आज श्रीनिवास राव भीमवरम, उंडी, पेडापुल्लेरू आणि आसपासच्या भागांतील शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी सेवा पुरवतात. खरीप आणि रब्बी हंगामात ते जवळपास दोन हजार एकर क्षेत्रावर कीटकनाशक फवारणी करतात. प्रति एकर सुमारे ४०० रुपये शुल्क आकारून ते वर्षाला सुमारे १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. पायलटचे वेतन, बॅटऱ्या, चार्जर्स आणि देखभाल खर्च वजा केल्यानंतरही त्यांना सुमारे सहा ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
हा ड्रोन अवघ्या पाच ते दहा मिनिटांत एका एकरावर फवारणी करू शकतो आणि दिवसाला सुमारे ४० ते ५० एकर क्षेत्र व्यापू शकतो. त्यामुळे कीटकनाशकांची एकसमान फवारणी होते आणि अपव्यय कमी होतो. शेतकऱ्यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढली असून शेतीचा खर्चही कमी झाला आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सी. नागाराणी यांनी त्यांच्या कार्याची नुकतीच दखल घेतली. त्यांनी थुंदुर्रू गावाला भेट देऊन भात पिकांवरील ब्लास्ट रोग नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या फवारणीची पाहणी केली. अभियांत्रिकी ज्ञान आणि शेती यांचा हा अनोखा मेळ साधल्याबद्दल त्यांनी श्रीनिवास राव यांचे कौतुक केले आणि अधिकाधिक ग्रामीण युवकांना ड्रोन संचालनाचे प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले. व्यावसायिक यशासोबतच श्रीनिवास राव यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक कार्यासाठीही केला आहे. विजयवाड्याजवळील बुडमेरू येथील पुरावेळी त्यांनी आपल्या ड्रोनच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत अन्नपॅकेट्स पोहोचवली. त्यामुळे या नवतंत्रज्ञानाची मानवतावादी उपयुक्ततादेखील अधोरेखित झाली आहे.
'पारंपरिक शेती दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत चालली आहे. तंत्रज्ञानाधारित शेतीमुळे सुशिक्षित युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात,' असे सांगून श्रीनिवास राव यांनी तरुण पदवीधरांना कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात संधी शोधण्याचे आवाहन केले. 'आमचा प्रवास ट्रॅक्टरपासून सुरू झाला, त्यानंतर कापणी यंत्रणा आणली आणि आता आम्ही तिसऱ्या टप्प्यात ड्रोन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. शेतीला आजच्या काळातील प्रवाह आणि तंत्रज्ञानानुसार अद्ययावत करणे आवश्यक आहे,' असेही त्यांनी नमूद केले.
त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास भारतीय शेतीतील बदलत्या चित्राचे प्रतीक ठरत आहे, जिथे नवकल्पना, उद्योजकता आणि तंत्रज्ञान ग्रामीण जीवनाला नवी दिशा देत आहेत. कष्ट करण्याची तयारी, चिकाटी आणि नवतंत्रज्ञानाची कास धरून आपण शेतीसारख्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी करू शकतो, हेच राव यांच्या या यशातून दिसून येते आणि हीच नवभारताची ओळख आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment