गो. नी. दांडेकर

गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त (एक जून) त्यांचा कार्यपरिचय...

गो. नी. दांडेकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

गो. नी. दांडेकर म्हणजे केवळ लेखक नव्हे, तर ते एक भरभरून जगणारे व्यक्तिमत्व होते. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारे बहुरंगी, बहुढंगी, स्वच्छंद व्यक्तिमत्त्व. बालवयातच स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याच्या ईर्ष्येने त्यांनी घर सोडले आणि महाराष्ट्रभर भ्रमण केले. तळकोकण आणि सह्याद्रीचे सौंदर्य त्यांच्या नसानसात भिनले होते. त्यांचा जन्म विदर्भातला. गो. नी. दांडेकर यांचा जन्म आठ जुलै १९१६ रोजी परतवाडा येथे झाला. वयाच्या १२व्या वर्षी सातवीतून शाळा सोडून ते संत गाडगेबाबांच्या सान्निध्यात आले. त्यांच्याच उपदेशाने त्यांनी गावोगाव भटकंती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा अनेक साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनातून समाजात घडणार्‍या घडामोडींवर फक्त प्रतिक्रिया व्यक्त झालेली नसते, तर तो अनुभवसंपन्न आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा आहे. त्यांच्या लेखनातील वेदनाही अस्सल आणि विचारही नवा आहे.

विदर्भात जन्मलेले असूनही त्यांना आकर्षण होते कोकणाचे! त्यांच्या लेखनातून बागा, तळी, नदी, शेते यातून तिथला माणूस किती समृद्ध आहे, याची आपल्याला कल्पना येते. तिथल्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे गुण-दोष, स्थानिकांच्या अडचणी, आणि मग त्यांची मानसिकता याचे यथार्थ दर्शन त्यांच्या लेखनातून होते. यातून आपण त्या पात्राशी स्वतःला जोडून घेतो. मग पुस्तकांचा आणि आपला प्रवास एकत्र सुरू राहतो. कोकणाचे वर्णन करणारी त्यांची अनेक पुस्तके आहेत, त्यातच शितू आणि पडघवली ही दोन कायम लक्षात राहण्यासारखी पुस्तके आहेत. यात ते केवळ वर्णनात्मक न लिहिता तेथील समाजव्यवस्थेचा आपल्याला अंदाज येतो. 

चित्रपाषाणांचा त्यांचा संग्रह होता. त्यातूनच त्यांची सौंदर्यासक्ती दिसून येते. रंगीबेरंगी दगड, स्फटिकासारखे असंख्य पैलू असणारे शुभ्र आणि पारदर्शक दगड, गुलाबी-जांभळी छटा असणारे दगड त्यांनी जमवले होते. सह्याद्रीत दुर्गभ्रमंती करताना जमवलेला हा खजिना आणि पाहिलेले निसर्गवैभव त्यांनी लेखन रूपाने साकारले आहे ते दुर्गभ्रमणगाथेत. त्यात केवळ १७-१८ किल्ल्यांचे वर्णन आहे. त्यातही राजगडाविषयीच जास्त लिहिले आहे. किल्ल्यांविषयी लिहिताना ते त्या किल्ल्यावरची वनसंपदा, वृक्षवल्ली, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोलसुद्धा सांगतात. किल्ल्यावर वस्ती असेल, तर त्या माणसांविषयी ते न चुकता लिहितात. हा किल्ला कोणत्या काळात, कसा कसा बदलत गेला, हे सांगताना त्याचे वास्तुरचनाशास्त्र, राजकीयद़ृष्ट्या, संरक्षणद़ृष्ट्या त्याचे महत्त्व अशा अनेक मुद्द्यांचा सखोल अभ्यासपूर्व लेखन त्यांच्या या पुस्तकातून समजते. 

किल्ल्यावर बसून घालवलेल्या चांदण्या रात्री, सूर्यास्ताच्या वेळी कड्यावरून दिसणारे खालचे हिरवे चमचमते तळकोकण वाचताना मोह पडतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा या देशातल्या संपन्न राजवटींनी हे किल्ले बांधले, वापरले आहेत; मात्र जवळजवळ सर्वच किल्ल्यांचं आज दिसणारे रूप हे शिवकाळातीलच. या इतिहासाची आठवण ते करून देतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक 'गोनीदांची दुर्गचित्रे' या नावाने प्रकाशित झाले आहे. 'दुर्गदर्शन', 'किल्ले', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. 

स्मरणगाथेमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंना वाचकांसमोर ठेवले आहे. गाडगेबाबांचा सहवास, ज्ञानेश्वरीचे वाचन-पठण, महाराष्ट्र भ्रमंती, परिक्रमा आणि जीवनासाठी करावा लागलेला संघर्ष या सगळ्याचे वर्णन त्यात आहे. कुणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक नर्मदा परिक्रमेवरच आहे. 

घरातून पळून गेल्यानंतर त्यांना लाभलेली संत गाडगेबाबांची संगत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. कीर्तने, निरूपणांचा छंद लागला, महाराष्ट्र भ्रमंतीमुळे ज्ञानेश्वरी, वेद अशा पौराणिक साहित्याशी जवळून संबंध आला. त्यांनी समर्थ रामदासांचे चरित्रही लिहिले. रामदास आणि त्यायोगे छत्रपती शिवाजी महाराज, निसर्ग, वनस्पती, तत्कालीन समाजव्यवस्था, गावे वसायच्या पद्धती सगळे सगळे यात दिसते. रामदासांनी केलेले कार्य आणि घडवून आणलेली निःशस्त्र क्रांती यातून स्पष्ट होते. रामदासांचे संघटन, बलोपासना आणि भक्ती हे गुण त्यांचे चरित्र वाचताना ठळकपणे दिसून येतात. 

त्यांनी चित्रपटलेखनदेखील केले. त्यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे जैत रे जैत. गो. नी. दांडेकर १९८१मध्ये अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक 'स्मरणगाथा' पुस्तकाला १९७७मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच, पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगर परिषदेने नगरभूषण, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साहित्य वाचस्पती म्हणून गोनीदांना गौरवले. शिवाय, नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा नानासाहेब नारळकर पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा दुर्गप्रेमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. एक जून १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! 

(स्रोत : महाराष्ट्र टाइम्समधील लेख)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement