अमृत परिवार सर्वेक्षण - केवळ माहिती गोळा करण्याचा नव्हे, तर समाज समजून घेण्याचा उपक्रम

चंद्रपूर जिल्ह्यात मिळाला उत्तम प्रतिसाद

अमृत परिवार सर्वेक्षण - केवळ माहिती गोळा करण्याचा नव्हे, तर समाज समजून घेण्याचा उपक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणावेळी आलेले अनुभव....

अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाची सुरुवात आठ एप्रिल २०२६पासून करण्यात आली. या अभियानाचा मुख्य उद्देश अमृत संस्थेच्या गावागावांतील लक्ष्यित गटातील कुटुंबांची अचूक माहिती संकलित करणे आणि समाजातील विविध घटकांची संपर्क प्रस्थापित करणे हा होता. सर्वेक्षण हा माझ्यासाठी एक नवीन आणि समृद्ध अनुभव होता. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मला ग्रामीण जीवनाची जवळून ओळख करून घेण्याची संधी मिळाली. गावातील लक्ष्यित गटातील लोकांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या अडचणी, तसेच त्यांच्या गरजा समजून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरला. सर्वेक्षणाच्या कालावधीत मी गावातील लक्ष्यित गटातील कुटुंबांना भेट दिली. त्यांना अमृत संस्थेच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत केले. अनेक ठिकाणी लोकांनी मला सहकार्य केले, तर काही ठिकाणी सुरुवातीला संकोच जाणवला; मात्र संवाद वाढत गेल्यावर लोकांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले. या सर्वेक्षणादरम्यान एकूण ९६ ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. लक्ष्यित गटातील जवळपास १७५ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे विविध गावांतील परिस्थिती जवळून पाहण्याची संधी मिळाली. 

सर्वेक्षण करताना काही अनुभव आव्हानात्मक होते, तर काही अतिशय आनंददायी होते. सर्वेक्षणावेळी एका ठिकाणी एका व्यक्तीचा सुरुवातीला माझ्यावर विश्वास बसत नव्हता. मी काहीतरी फसवणूक करत आहे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी माझा फोटो काढला आणि माझा मोबाइल नंबर लिहून घेतला. त्या वेळी मी शांतपणे त्यांना सर्वेक्षणाचा उद्देश समजावून सांगितला आणि योग्य माहिती दिली. नंतर त्यांचा गैरसमज दूर झाला आणि त्यांनी सहकार्य केले. या अनुभवातून मला संयम आणि स्पष्ट संवादाचे महत्त्व शिकायला मिळाले. 

दुसऱ्या ठिकाणी मात्र पूर्णपणे वेगळा अनुभव आला. काही लोकांनी मला आपल्या घरात बसवले, माझे आदरातिथ्य केले आणि नाश्ता व सरबत देऊन स्वागत केले. अशा प्रेमळ वागणुकीमुळे मला खूप आनंद झाला आणि काम करण्याची ऊर्जा मिळाली. या सर्व अनुभवांमुळे मला समजले, की प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी आणि प्रतिक्रिया वेगळी असते. योग्य संवाद आणि प्रामाणिकपणामुळे आपण कोणाचाही विश्वास जिंकू शकतो. एकूणच, सर्वेक्षण हा केवळ माहिती गोळा करण्याचा नव्हे, तर समाज समजून घेण्याचा आणि त्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा देणारा एक महत्त्वपूर्ण अनुभव ठरला. 

- सतीश नारायण दास

अमृतमित्र, चंद्रपूर

.........

अधिक माहितीसाठी संपर्क :

विक्रम मोहन पांडे – 9112228774

चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402

ई-मेल : amrut.chandrapur.dm@gmail.com

Publisher: सतीश नारायण दास News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:44 PM News publication time | Views: 625 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: सतीश नारायण दास News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:44 PM News publication time | Views: 625 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

R
Ravi pulliwar Malaiya Pulliwar
07-05-2026 11:37 PM

I will agree

Write a Comment
0 / 50 words
Advertisement