अमृत संस्थेच्या मानसमित्र या अनोख्या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

मन मोकळे करण्यासाठी आपण बोललेले ऐकून घेऊन मार्ग दाखवणारा, ताण हलका करणारा डिजिटल सखा

अमृत संस्थेच्या मानसमित्र या अनोख्या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या मानसमित्र या अनोख्या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन अतिरिक्त फोटो

पुणे : 'शालेय मुले, तसेच महाविद्यालयीन युवक-युवती मानसिक बदलांच्या टप्प्यांमधून जात असल्याने त्यांचे अनेक मानसिक प्रश्न असतात. भावना व्यक्त करणे, त्यांचे नियमन करणे, याकरिता त्यांच्यासाठी सुरक्षित, चांगल्या माध्यमाची कमतरता आहे. त्याबरोबरच समाजातील जवळपास प्रत्येकालाच सध्या कोणत्या ना कोणत्या मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागत असते. ही बाब ओळखून सुरू करण्यात आलेले अमृत मानसमित्र हे डिजिटल माध्यम अत्यंत उपयुक्त असून, असे माध्यम सुरू करणारी अमृत ही पहिलीच संस्था असावी,' असे गौरवोद्गार मान्यवरांनी 'अमृत मानसमित्र' उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण संस्था अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात एका छोट्या समारंभात नुकतीच या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पाषाण (पुणे) येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेतील सहायक प्राध्यापक व मनोरुग्ण समाजकार्य विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल कापसे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसेनजित फडणवीस आणि अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी अमृत संस्थेचे कर्मचारी आणि मानसमित्र उपक्रमाचे डेव्हलपर्सही उपस्थित होते.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यातही शालेय आणि महाविद्यालयीन युवक-युवतींना मनात येणाऱ्या बऱ्या-वाईट भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित माध्यम उपलब्ध नाही. या भावना व्यक्त करण्यासाठी कोणी जवळची विश्वासार्ह व्यक्ती मिळणेही दुरापास्त झाले आहे. ही उणीव ओळखून अमृत या संस्थेने मानसमित्र हे डिजिटल माध्यम उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसाठी हे एक अत्यंत विश्वासू, वापरण्यासाठी सहज-सोपे, कृतिशील आणि सुलभ भाषेतील माध्यम आहे.

मानसमित्र ही सुविधा शाळा-महाविद्यालयातील युवक-युवती वैयक्तिक पातळीवर वापरू शकणार आहेत. वापरणाऱ्यांकडून दिली जाणारी माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. यातील माहिती १०० टक्के एन्क्रिप्टेड असून, ती माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही. त्यामुळे मनातील भावना बिनधास्तपणे व्यक्त करण्यासाठी हे अगदी प्रभावी माध्यम ठरणार आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले माध्यम असून, ते '२४ बाय ७' उपलब्ध असेल. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असले, तरी हे माध्यम मानवी संवेदनशीलतेचा विचार करून तयार करण्यात आले आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका हे माध्यम निभावू शकेल. मन मोकळे करणे हा ताण हलका करण्याचा पहिला टप्पा असतो. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मानसमित्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मानसिक आणि सामाजिक प्रगती हे उद्दिष्ट ठेवून मानसमित्र हे माध्यम अमृत संस्थेने सुरू केले असून, उपस्थित मान्यवरांनी अमृत मानसमित्र या अनोख्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.

लिंक :https://app.amrutmanasmitra.org/

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:21 PM News publication time | Views: 692 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:21 PM News publication time | Views: 692 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

राजेंद्र कानडे
06-05-2026 06:00 PM

उपक्रम छान आहे.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement