नव्या पिढीला संस्कारांचे अमृत देणारा अमृत वर्ग

राज्य शासनाच्या अमृत संस्थेचा चाकोरीबाहेरचा, प्रेरक उपक्रम

नव्या पिढीला संस्कारांचे अमृत देणारा अमृत वर्ग मुख्य फोटो
नव्या पिढीला संस्कारांचे अमृत देणारा अमृत वर्ग अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या लक्ष्यित गटासाठी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तर राबवतेच; पण त्या पलीकडे जाऊन ही संस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीही विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे अमृत वर्ग. पुढची पिढी म्हणजेच उद्याचे नागरिक घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवला जातो. त्या उपक्रमाविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. केवळ पाठ्यपुस्तकांमधून मिळणारे ज्ञान पुरेसे नाही. शिस्त, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने अमृत वर्ग हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आयोजित केला जातो. आजचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे नवी पिढी या तंत्रज्ञानासोबतच वाढते. म्हणूनच त्यांच्यावर संस्कार होण्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जीवनमूल्यांची जोड देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो.

अमृत वर्ग हा भविष्यातील सक्षम नेतृत्व घडवण्याचा संस्कारमय उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणे, देशाबद्दल आत्मीयता वाढवणे आणि जबाबदार नागरिक म्हणून त्यांचा विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नववीपर्यंतचे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून या वर्गाची रचना करण्यात आली.

दररोज एक तास चालणाऱ्या या उपक्रमात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा समतोल साधण्यात येतो. सत्राची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने होते. त्यानंतर हलका व्यायाम आणि सूर्यनमस्कार घातले जातात. शरीर सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने या व्यायामांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले जाते आणि कृतीतून दाखवले जाते. विविध बैठे खेळ विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवतात आणि आज्ञा अभ्यासातून शिस्त आणि तत्परता विकसित होते.

संघभावना, चपळता आणि निर्णयक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मैदानी खेळही घेतले जातात. याशिवाय गीत, प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रीय घोषणांद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला सकारात्मक दिशा दिली जाते. संस्कार करणारे श्लोक म्हटले जातात. सत्राची सांगता शांतिमंत्राने केली जाते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध जीवनशैली, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. समस्या सोडवण्याची क्षमता वाढीला लागते आणि सामूहिक कार्याची जाणीव निर्माण होते. विशेष म्हणजे विद्यार्थी पुढे स्वतः नेतृत्व स्वीकारून नवीन वर्ग सुरू करण्यासाठी प्रेरित होतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य करतात, असा अमृत संस्थेचा अनुभव आहे.

राज्यात सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून १००हून अमृत वर्ग नियमितपणे घेतले जातात. त्यात वाढही होत आहे. रिसोड, सांगली, वरसोली (रायगड) यांसह काही ठिकाणी अलीकडेच निवासी अमृत वर्ग अर्थात अमृत आनंदमेळाही घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, तिचे वेगळेपण, वैशिष्ट्ये अशा अनेक बाबींविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. नेहमीच्या परिघापेक्षा वेगळ्या विषयाचे ज्ञान मुलांना मिळाल्यामुळे त्या विषयांमधील अधिक ज्ञन घेण्याचे कुतूहल अनेक विद्यार्थ्यांमध्ये जागृत झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे काही वाचण्याची प्रेरणा मिळाली आहे.

एकंदरीतच, 'सशक्त युवक – समर्थ भारत' हा संकल्प डोळ्यांसमोर ठेवून अमृत वर्ग विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार आणि नेतृत्वक्षमता विकसित करण्याची बीजे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात जबाबदार आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अमृत वर्गातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शिस्त, त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आत्मविश्वास यांचे विशेष कौतुक अनेक मान्यवरांनी केले आहे. अमृत वर्गामार्फत राबवण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले असून, अनेक मान्यवर व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वैचारिक प्रेरणा मिळते. समाजात जागरूक व जबाबदार नागरिक घडवण्याच्या अमृत वर्गाच्या समाजोपयोगी भूमिकेला त्यामुळे अधिक बळ मिळते.


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 12:19 PM News publication time | Views: 493 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 12:19 PM News publication time | Views: 493 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement