पालघरच्या वनिता उराडे यांची नर्सरी व्यवसायातील प्रेरक यशोगाथा
जिद्दीने मेहनत केली आणि त्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली, की यशाचे शिखर सहज सर करता येते, हे पालघर जिल्ह्यातील रोठे (केळवा रोड) येथील सौ. वनिता विनोद उराडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या वनिताताईंनी घरची बेताची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी उचललेले पाऊल आज एका यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाले असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेचे त्या एक चालते-बोलते उदाहरण बनल्या आहेत.
सुरुवातीला शेतीकामात गुंतलेल्या वनिताताईंना स्वतःचा काहीतरी स्वतंत्र व्यवसाय असावा, अशी तीव्र इच्छा होती. ही संधी त्यांना स्वयंसहायता गट आणि ईएपी कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली. याद्वारे त्यांना ठाणे येथील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची (RSETI) माहिती मिळाली. याच संस्थेत त्यांनी २३ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पॉलिहाउस आणि शेडनेट शेती या विषयावर १० दिवसांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाने त्यांच्यातील सुप्त कौशल्याला वाव दिलाच; पण त्यासोबतच आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापनाचा नवा दृष्टिकोनही दिला.
प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांनी वेळ न घालवता २७ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या स्वप्नाला मूर्त रूप दिले. सुमारे एक लाख ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी व्हर्मी कंपोस्ट आणि नर्सरी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. बँक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला. आज त्यांच्या रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारची झाडे आणि उच्च दर्जाचे गांडूळखत उपलब्ध असून, ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय अल्पावधीतच स्थिरावला आहे.
एके काळी केवळ गृहिणी आणि शेतकरी म्हणून वावरणाऱ्या वनिताताई आज दरमहा १७ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. केवळ स्वतःसाठी रोजगार निर्माण न करता, त्यांनी आपल्या कुटुंबाला एक भक्कम आर्थिक आधार दिला आहे. या प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल लक्षणीय आहे; वाढलेला आत्मविश्वास, प्राप्त झालेले स्वावलंबन आणि समाजात निर्माण झालेली एक यशस्वी उद्योजिका ही ओळख हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न असून, त्यांचा हा यशस्वी प्रवास पालघरमधील शेकडो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment