दुर्गाबाई भागवत

श्रेष्ठ मराठी लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्या स्मृतिदिनानिमित्त (सात मे) त्यांचा अल्प परिचय...

दुर्गाबाई भागवत मुख्य फोटो
मुख्य फोटो

श्रेष्ठ मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्धधर्म या विषयांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या म्हणजे दुर्गाबाई भागवत. त्यांचा जन्म इंदूर येथे १० फेब्रुवारी १९१० रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे या शहरांमध्ये झाले. १९२७मध्ये त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२मध्ये त्या संस्कृत व इंग्रजी विषय घेऊन पहिल्या वर्गात बीए झाल्या. महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५मध्ये त्या एमए झाल्या. त्यासाठी इंडियन कल्चरल हिस्टरी शाखेत ‘अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स’ या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएचडीच्या प्रबंधासाठी ‘सिंथेसीस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या विषयावर त्यांनी संशोधनकार्य केले. परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेन्री डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होती.

पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९५८-६० या काळात त्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी होत्या. तसेच साहित्य-सहकार या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स (१९३८) हा होता. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत - व्यक्तिचित्र व वाङ्मयविवेचन (१९४७) आणि पहिला मराठी ललित ग्रंथ महानदीच्या तीरावर - गोंडजीवनावरील नवलिका (१९५६) हा होता. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनाला प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी (१९४०) बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर (१९४६), ए प्रायमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (१९५०) भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ होते. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होता.

शास्त्रीय भूमिकेतून भारतीय लोकसाहित्याचा जागतिक संदर्भात मूलमापनात्मक विचार करणाऱ्या लोकसाहित्याची रूपरेखा (१९५६) या ग्रंथात दुर्गाबाईंनी सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया सांगून भारतीय लोकजीवनाच्या दीर्घ परंपरेतून प्रतीत होणारे सांस्कृतिक एकात्मतेचे सूत्र स्पष्ट केले. धर्म व लोकसाहित्य (१९७५) या ग्रंथामध्ये या दोहोंचे परस्परसंबंध सामाजिक मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून पारखून घेतलेले आहेत. रवींद्रनाथांच्या लोकसाहित्य या ग्रंथाच्या अनुवादाला (१९६०) जोडलेल्या प्रस्तावनेतूनही दुर्गाबाईंची लोकसाहित्याभ्यासाची वस्तुनिष्ठ, शास्त्रीय भूमिका स्पष्ट होते. या तात्त्विक अभ्यासाला पूरक असे त्यांचे कार्य भारतातील विविध प्रांतातील लोककथांच्या मराठी अनुवादाचे आहे. शिवाय व्ही. फॉसबोल संपादित पाली जातकथांच्या आधारे त्यांनी जातककथा मराठीत आणल्या (सिद्धार्थ जातक). हेन्री डेव्हिड थोरोच्या ग्रंथाच्या वॉल्डनकाठी विचार विहार (१९६४) व चिंतनिका (१९६८) या अनुवादांतून तसेच ऑगस्ट डलर्थेलिखित थोरोच्या चरित्राच्या अनुवादातून (काँकॉर्डचा क्रांतिकारक, १९६९) त्यांनी या अमेरिकन तत्त्ववेत्त्याचे जीवनकार्य व विचार मराठीत आणले. त्यांनी १९६७मध्ये केतकरी कांदबरी हा समीक्षात्मक ग्रंथ तयार केला.

साने गुरुजींच्या लेखनाने प्रेरित होऊन दुर्गाबाई प्रथम ललित लेखनाकडे वळल्या. महानदीच्या तीरावर ही गोंडजीवनातील प्रेमकथा त्यांची पहिली ललितनिर्मिती होती. पुढे दीर्घ आजारपणातील बंदिस्त एकांतवासाने त्यांना नव्याने ललित लेखनाची प्रेरणा दिली. ऋतुचक्र (१९५६) या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. भावमुद्रा (१९६०), पैस (१९७०), डूब (१९७५) या संग्रहातून कसदार ललितलेखनाचा एक स्वतंत्र बाज दिसून येतो. त्यांच्या संशोधक, जिज्ञासू वृत्तीचा एका वेगळ्या प्रक्रियेतून घडलेला स्वतंत्र आविष्कार त्यातही आढळतो. व्यासपर्व (१९६२) ही त्यांची आणखी एक कसदार निर्मिती होती. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचा व त्यांच्या जीवनाचा सर्जक अन्वयार्थ लावणारे हे व्यासपर्व अलौकिकतेचा, अमानुषतेचा मानुषतेशी दुवा जोडून एका विशाल अनुभूतीचा प्रत्यय घडवते. परंपरेच्या संचितातून लाभलेल्या कथाबीजांतून साधलेली नवविर्मिती पूर्वा (१९५७) या त्यांच्या कथासंग्रहातून दिसते. रूपरंग (१९६७) या पुस्तकामधून त्यांनी काही व्यक्तिचित्रे सादर केली आहेत. तसेच आत्मवृत्तात्मक असे स्फुटलेखन प्रासंगिकात (१९७५) व लहानी (१९८०) यांमध्ये आले आहे.

आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन-विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पत्करला. विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व खऱ्या लोकशाहीची निर्माण होण्यासाठी विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मुक्ता (१९७७) व जनतेचा सवाल (१९७९) ही त्यांच्या त्या काळातील भाषण लेखांची संकलने आहेत. कराड येथे भरलेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले (१९७५). त्यांच्या पैस या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे (१९७१). अशा या महान लेखिकेचे सात मे २००२ रोजी मुंबईत निधन झाले. साहित्यातील त्यांच्या महान कार्याला वंदन!

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 270 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement