विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासाठी वेचली पन्नास वर्षे; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील साखळी या गावचे धोंडूअण्णा माळी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा विश्व हिंदू परिषदेद्वारे जळगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यांनी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली आणि त्यापैकी पन्नास वर्षे त्यांनी पूर्णवेळ विश्व हिंदू परिषदेच्या कामासाठी दिली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा विश्व हिंदू परिषदेने आयोजित केला होता.
धोंडूअण्णा माळी यांनी विशेष करून मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीची विशेष कामे केली. वडिलांसारखे छत्र मुलींना दिल्यामुळे अनेक मुली, अनेक दुर्गा, अनेक मातृशक्ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये तयार झाल्या आणि मातृशक्ती दुर्गावाहिनीचे एक मोठे काम जिल्ह्याभरामध्ये सुरू झाले. केवळ जिल्हा नव्हे, तर प्रांतातील आणि महाराष्ट्रातील अनेकांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्या युगामध्ये मोबाइल हे साधन नसल्यामुळे डायरी व पेन या माध्यमातून ते सर्वांशी नियमितपणे संपर्क साधत होते. त्यांच्या संघटनेसाठीच्या मोठ्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने त्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दलचे अनुभवकथन केले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी धोंडूअण्णांसोबतच्या आठवणी जागवल्या. 'जिथे कोणतेही काम अडत असेल, त्या ठिकाणी अगदी प्रेमाने गोड बोलून समोरच्याकडून ते काम पूर्ण करून घेण्याची कला त्यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक राजेशआबा पाटील, प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे, सहमंत्री ललित चौधरी, आमदार सुरेश दामू भोळे (उर्फ राजू मामा), माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमावेळी अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment