कोकणातील छोट्याशा गावापासून थेट दिल्लीपर्यंत...

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी प्रज्ञा पवार यांची प्रेरणादायी कथा

कोकणातील छोट्याशा गावापासून थेट दिल्लीपर्यंत... मुख्य फोटो
कोकणातील छोट्याशा गावापासून थेट दिल्लीपर्यंत... अतिरिक्त फोटो

कोकणच्या लाल मातीत जिद्द पेरली की यशाचे सोने उगवते, याचा प्रत्यय रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील मठ-असोडे येथील प्रज्ञा प्रकाश पवार यांच्या रूपाने येत आहे. चुलीच्या धुरापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून त्यांनी घेतलेली ही झेप जिल्ह्यातील हजारो महिलांसाठी पंखांत बळ देणारी ठरली आहे.

​कृषी सखी ते दिशादर्शक : बदलाचे नवे तंत्र

​२०१४मध्ये 'उमेद'शी जोडले गेलेले प्रज्ञाताईंचं नाते आज एका वटवृक्षासारखे विस्तारले आहे. २०१७मध्ये त्यांनी कृषी सखी म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि परिवर्तनाला सुरुवात झाली. कुर्णे आणि गवाणे या गावांत त्यांनी पारंपरिक भातशेतीला फाटा देऊन महिलांना 'श्री' पद्धतीचे आधुनिक तंत्र शिकवले. सुरुवातीला संशय घेणाऱ्या नजरांनी जेव्हा भाताचे भरघोस उत्पन्न पाहिले, तेव्हा संपूर्ण गावच या तंत्राच्या प्रेमात पडले. भातासोबतच नाचणी लागवड आणि जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा मंत्र देऊन त्यांनी घराघरांत आर्थिक सुबत्ता आणली.

कलमांतून फुलले अर्थकारण

​प्रज्ञाताईंनी केवळ उपदेश केला नाही, तर स्वतःच्या कृतीतून आदर्श उभा केला. आपल्या पतीच्या खंबीर साथीने त्यांनी स्वतःचा कौटुंबिक नर्सरी व्यवसाय उत्तुंग शिखरावर नेला. त्यांच्या नर्सरीत आज वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ या काजूच्या जातींची १० ते १५ हजार रोपे दिमाखात डोलत आहेत. आंबा, नारळ, सुपारी, कोकम आणि सोनचाफ्याच्या कलमांतून होणारी लाखोंची उलाढाल त्यांच्या परिश्रमाची साक्ष देते. विशेष म्हणजे, त्यांनी गावातील ५ ते ७ महिलांना हक्काचा रोजगार दिला असून, शेकडो भगिनींना कलम बांधणीचे मोफत प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले आहे.

​हस्तकला आणि प्रदर्शने

​केवळ शेतीच नव्हे, तर हातातील कलेलाही त्यांनी वाव दिला. शिवणकामाची आवड असलेल्या प्रज्ञाताईंनी कापडी पिशव्या आणि बॅग्ज बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी बनवलेल्या वस्तूंनी रत्नागिरी सरस प्रदर्शनापासून ते मुंबईच्या महालक्ष्मी सरसपर्यंत आपली छाप उमटवली आहे.

​दिल्लीचा दरबार आणि राष्ट्रीय गौरव

​प्रज्ञाताईंच्या कार्याची खरी पावती तेव्हा मिळाली, जेव्हा त्यांची निवड थेट राजधानी दिल्लीसाठी झाली. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या महिला कृषी प्रतिनिधींच्या कार्यक्रमात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. एका ग्रामीण भागातील महिलेने दिल्लीच्या दरबारात जिल्ह्याचा मान वाढवावा, ही बाब संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

​सेंद्रिय शेतीचा वसा

सध्या त्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पात कार्यरत असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार करत आहेत. जीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर करून त्यांनी परसबाग ही संकल्पना घराघरांत रुजवली आहे.

'जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर आकाशाला गवसणी घालता येते,' हे प्रज्ञाताईंनी सिद्ध करून दाखवले आहे. गावातून सुरू झालेला हा प्रवास आता जागतिक क्षितिजाकडे झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांचा हा संघर्ष आणि यश नक्कीच प्रेरणादायी आहे.

- अमृता भातडे-धुंदूर, रत्नागिरी

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 02-05-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 393 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 02-05-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 393 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement